भद्रावती शहराला बिबट्याच्या दहशतीतून दिलासा


- आठवडाभराच्या पाठलागानंतर वनविभागाला मोठे यश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : भद्रावती शहरातील भंगाराम वॉर्डासह पिंडोनी स्मशानभूमी, पद्मावर वाडी, शिवाजी नगर, पिंडोनी तलाव आणि आयडिया टॉवर परिसरात गेल्या आठवडाभरापासून मुक्तपणे वावरत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या बिबट्याला अखेर शुक्रवारी दुपारी सुमारे २ वाजता वनविभागाने जेरबंद केले. नियोजनबद्ध मोहिमेला यश आल्याने शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. पोलिस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, महावितरण कार्यालय, क्रीडा संकुल, पिंडोनी स्मशानभूमी, पद्मावर वाडी आणि शिवाजी नगर परिसरात त्याचा मुक्त संचार सुरू होता. या पार्श्वभूमीवर वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने दोन दिवस विशेष शोधमोहीम राबवून विविध ठिकाणी पिंजरे लावले आणि बिबट्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले.
शुक्रवारी पहाटे भंगाराम वॉर्डातील भाऊराव धुळे यांच्या घराशेजारील गोठ्यात घुसून बिबट्याने एका बकरीवर हल्ला केला. नागरिकांनी आरडाओरड केल्याने तो तेथून पसार झाला. त्यानंतर पद्मावर वाडी परिसरात एका घराच्या भिंतीवर बसून पाळीव कुत्र्यावर झडप घालण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. आयडिया टॉवर परिसरातही तो कुत्र्याच्या मागावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
प्रथम फटाक्यांच्या आवाजाने बिबट्याला मानवी वस्तीपासून दूर हुसकावण्यात आले. त्यानंतर त्याच्या हालचालींचा अंदाज घेत शिवाजी नगर परिसरात पिंजरा उभारण्यात आला. अखेर दुपारी सुमारे २ वाजता बिबट पिंजऱ्यात अडकताच वनविभागाच्या मोहिमेला यश मिळाले.
बिबट जेरबंद झाल्याची माहिती मिळताच परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भद्रावती पोलिसांनी तातडीने बंदोबस्त तैनात केला. वनविभागाने बिबट चिडू नये म्हणून पिंजऱ्यावर ग्रीन नेट टाकून त्याला सुरक्षित ठेवले.
वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांनी सांगितले की, पकडलेल्या बिबट्याला गंधा नाला नर्सरी येथे सुरक्षित ठेवण्यात आले असून त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर वन्यजीव नियमांनुसार योग्य अधिवासात सोडण्यात येणार आहे.
या संपूर्ण मोहिमेत क्षेत्र सहाय्यक के. डी. कांबळे, प्रभारी क्षेत्र सहाय्यक ठाकरे, वनरक्षक जितेंद्र देवगडे, किशोर मडावी, अनिल शेंद्रे, पवन मांढरे, नितीन राऊत, अमर किन्नाके, शिथिल मडावी, दीपक निंबाळकर, सार्ड एनजीओचे पथक तसेच वनविभागाच्या इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
दरम्यान, भंगाराम वॉर्डातील तलाव परिसरात वाढलेली झाडी, कचऱ्याचे ढीग, साचलेले सांडपाणी आणि अपुरी स्वच्छता यामुळे वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या समस्या तातडीने सोडवून परिसर सुरक्षित करण्याची मागणीही त्यांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे.
News - Chandrapur




Petrol Price




