रत्नापूर येथील सार्वजनिक विहिरीचे पाणी दूषित : सांडपाणी मिसळल्याने दुर्गंधी, नागरिकांच्या आरोग्याला धोका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील वॉर्ड क्रमांक ५ मधील सार्वजनिक विहिरीचे पाणी दूषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विहिरीत नाल्यातील सांडपाणी मिसळत असल्याने पाणी गढूळ झाले असून, त्यातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी ग्रामपंचायत रत्नापूरकडे निवेदनाद्वारे केली आहे. मंगळवार, २८ जुलै २०२६ रोजी देण्यात आलेल्या या निवेदनातून दूषित पाण्यामुळे गावात साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रत्नापूर येथे सार्वजनिक नळयोजनेद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था असली तरी नियमित पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पर्यायी जलस्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. ही गरज लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने धारीतील विहिरीवर सौरऊर्जेवर चालणारा मोटारपंप बसवून पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली आहे.
मात्र, या विहिरीच्या परिसरातून वाहणारे सांडपाणी तसेच विहिरीत साचलेला काडी-कचरा यामुळे पाण्याची गुणवत्ता खालावली आहे. विहिरीतील पाण्याला दुर्गंधी येत असून ते पिण्यास अयोग्य झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दूषित पाण्याचा वापर केल्यास नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून, जलजन्य आजार पसरण्याची भीती वाढली आहे.
याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे निवेदन देऊन विहिरीतील दूषित पाणी उपसून विहीर पूर्णपणे स्वच्छ करावी तसेच नागरिकांना तातडीने शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.
ग्रामस्थ मंगेश बोरकर, दिनेश्वर लोधे, ईश्वर ठीकरे यांच्यासह अनेक नागरिकांनी या समस्येकडे ग्रामपंचायतीचे लक्ष वेधले असून, प्रशासनाने त्वरित दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
News - Chandrapur




Petrol Price




