लाखांदूरच्या जंगलात चार वाघांचा वावर : ४० ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे वनविभागाची २४ तास नजर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : लाखांदूर तालुक्यातील इंदोरा, दहेगाव, मुर्झा आणि पारडीपर्यंतचा विस्तीर्ण जंगल परिसर सध्या चार वाघांचे अधिवासस्थान बनला असून, त्यांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने कडक उपाययोजना केल्या आहेत. वाघांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी जंगलात तब्बल ४० ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले असून, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र गस्त घालत असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चन्ने यांनी दिली.
जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर लाखांदूर तालुक्यातील जंगलाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. या जंगलाच्या सीमा गडचिरोली जिल्ह्यातील वडसा जंगल परिसर तसेच गोंदिया जिल्ह्यातील प्रसिद्ध नवेगाव बांध जंगलाशी जोडलेल्या आहेत. तिन्ही जिल्ह्यांच्या वनसीमा एकमेकांना लागून असल्यामुळे वाघांसह बिबटे, रानगवे आणि इतर वन्यप्राण्यांचा मुक्त संचार या भागात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. कोका अभयारण्यातही बिबट्यांसह रानगव्यांची संख्या वाढल्याने हा संपूर्ण पट्टा वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.
वाघांची शिकार होऊ नये, त्यांचा अधिवास सुरक्षित राहावा आणि त्यांच्या हालचालींवर सातत्याने नियंत्रण ठेवता यावे, यासाठी लाखांदूर वनविभाग विविध उपाययोजना राबवत आहे. जंगल परिसरात बसविण्यात आलेल्या ४० ट्रॅप कॅमेऱ्यांमधून वाघांच्या हालचालींचे नियमित निरीक्षण केले जात आहे. तसेच वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चन्ने यांच्या नेतृत्वाखाली तीन क्षेत्र सहायक, १३ वनरक्षक आणि तीन वनमजूर यांचे पथक दिवसरात्र जंगलात गस्त घालत असून, संपूर्ण परिसरावर कसून नजर ठेवली जात आहे.
२०२२ मध्ये सीटी-१ वाघाची दहशत -
लाखांदूर तालुक्यात २०२२ मध्ये सीटी-१ या वाघाने भीतीचे वातावरण निर्माण केले होते. या वाघाच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला होता. २७ जानेवारी रोजी दहेगाव जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेले प्रमोद चौधरी ५४ वर्षे रा. लाखांदूर ४ एप्रिल रोजी इंदोरा जंगलात मोहफुले गोळा करण्यासाठी गेलेले जयपाल कुंभरे ४० वर्षे २१ सप्टेंबर रोजी अरुणनगर येथील विनय खंगेन मंडल ४५ वर्षे आणि ३० सप्टेंबर रोजी शेतकरी तेजराम कार यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. सलग घडलेल्या या घटनांनंतर वनविभागाने विशेष मोहीम राबवून सीटी-१ वाघाला जेरबंद केले होते.
यंदाही शेतकऱ्याचा घेतला बळी -
यावर्षीही वाघाच्या हल्ल्याची घटना घडली. ३१ मार्च रोजी पहाटे तालुक्यातील खैरी पट शेतशिवारात स्थानिक शेतकरी डाकराम गोपीचंद देशमुख ४० वर्षे यांचा मृतदेह आढळून आला. मागील सायंकाळी ते शेतातील पिकांना सिंचन करण्यासाठी गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केला होता. या घटनेनंतर वनविभागाने तातडीने शोधमोहीम हाती घेतली आणि अवघ्या दोन दिवसांत संबंधित वाघाला जेरबंद करण्यात यश मिळविले.
सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य -
वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चन्ने यांनी सांगितले की, लाखांदूरच्या जंगलात सध्या चार वाघ वास्तव्यास असून, त्यांच्या सुरक्षिततेबरोबरच नागरिकांच्या संरक्षणालाही तितकेच महत्त्व दिले जात आहे. जंगल परिसरात जाणाऱ्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, एकट्याने जंगलात प्रवेश टाळावा आणि वाघ अथवा अन्य वन्यप्राण्यांचा वावर आढळल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
वन्यजीव संवर्धन आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वनविभाग सातत्याने प्रयत्नशील असून, आधुनिक तंत्रज्ञानासह नियमित गस्त आणि जनजागृतीच्या माध्यमातून वाघांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
News - Bhandara




Petrol Price




