महत्वाच्या बातम्या

  केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे वर्धेत स्वागत : उद्धवसेनेकडून विजय जल्लोष


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर वर्धा शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने रविवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात विजय जल्लोष साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व एकमेकांना मिठाई भरवत आनंद व्यक्त केला. यावेळी युवाशक्तीचा विजय झाला केंद्र सरकार झुकले तानाशाही नमली अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

कार्यकर्त्यांनी सांगितले की, दिल्लीतील जंतर-मंतर येथे युवकांचे शांततेत आंदोलन सुरू असताना आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली. विविध राज्यांमध्ये विद्यार्थी आणि युवकांनी आंदोलन छेडले. वाढत्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर अखेर केंद्र सरकारने माघार घेत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारल्याचे त्यांनी नमूद केले. या निर्णयाला युवकांच्या संघर्षाचा आणि लोकशाही मार्गाने झालेल्या आंदोलनाचा विजय असल्याची प्रतिक्रिया उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

यावेळी उपस्थितांनी शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय आणि परीक्षा प्रक्रियेत विश्वासार्हता निर्माण करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकारने अधिक संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रमोद भोमले, ॲड. अविनाश काकडे, महेंद्र मुनेश्वर, प्रवीण पेठे, रमेश दिवटे, सुदाम पवार, गोपाल दुधाने, पंकज सत्यकार, रवि चव्हाण, खुशाल राऊत, प्रमोद पांडे, प्रमोद देवडे, सुभाष कडे, स्वप्निल वागळे, देवानंद चौधरी, मंगेश शेंडे, सतीश नवरखेडे, दामोदर मुळे, प्रदीप मस्के, संतोष साळवे, निलेश बोंद्रे, शेखर वाळके, विठ्ठल वंजारी, गजानन जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 





  Print






News - Wardha




Related Photos