मिरची पूड फेकून सराफा व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न : अवघ्या २४ तासांत तिघांना बेड्या


- गडचिरोली पोलिसांची धडक कारवाई
- स्थानिक गुन्हे शाखेकडून गुन्ह्याचा उलगडा एका फरार आरोपीचा शोध सुरू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : ज्वेलरी दुकान बंद करून घरी जाणाऱ्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून सोन्या-चांदीचे दागिने लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखा व गडचिरोली पोलीस पथकाने संयुक्त कारवाई करत बुधवारी २ सप्टेंबर या तीनही संशयितांना अटक केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुरेश बाबूराव भोजापूरे ५० वर्षे रा. गडचिरोली यांचे गडचिरोली शहरात ‘ऐश्वर्या ज्वेलरी शॉप’ आहे. ३१ ऑगस्ट रोजी रात्री दुकान बंद करून ते आपल्या दुचाकीने सोन्या-चांदीचे दागिने व जेवणाचा डबा घेऊन घरी जात होते. गडचिरोली ते चामोर्शी रोडवरील जंगल सोसायटीसमोर एका दुचाकीवर आलेल्या अज्ञात भामट्यांनी त्यांना जबरदस्तीने अडवले. आरोपींनी भोजापूरे यांच्या चेहऱ्यावर मिरची पूड फेकून, त्यांच्या ताब्यातील डब्याने त्यांना मारहाण करत दागिने चोरण्याचा प्रयत्न केला.
मात्र, भोजापूरे यांनी प्रसंगावधान राखून आरडाओरड केल्याने अंधाराचा फायदा घेत आरोपींनी तेथून पळ काढला. या घटनेप्रकरणी १ सप्टेंबर रोजी गडचिरोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०९ (५) व ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाची चक्रे फिरली अन् सूत्रधार गळात घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा आणि गडचिरोली पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी तांत्रिक पुरावे, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावला. या लुटमारीत चार जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
यावरून पोलिसांनी गडचिरोली शहरातून विशाल घनश्याम देशमुख (३६, रा. रामनगर), राकेश विजय गिरसायळे (३५, रा. कन्नमवार नगर) आणि शहबाज सलाम शेख (३१, रा. विवेकानंद नगर, गडचिरोली) या तिघांना ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच या प्रकरणात सोनू खांडेकर (२४, रा. विवेकानंद नगर) याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. फरार सोनू खांडेकर याचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बुंदे करत आहेत. उत्कृष्ट तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे व अंमलदारांचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले आहे.




Petrol Price




