महत्वाच्या बातम्या

 हिंगणघाट पोलिसांकडून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे : शाळांमध्ये जनजागृती सप्ताहाचे आयोजन


- ऑनलाइन फसवणुकीपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना 

विदर्भन्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरासोबत सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हिंगणघाट पोलिस पथकाच्या वतीने शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे प्रकार, त्यापासून बचावाचे उपाय तसेच ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल आणि अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशानुसार संपूर्ण जिल्ह्यात १३ जुलै ते २० जुलैदरम्यान सायबर जनजागृती सप्ताह राबविण्यात आला. या अभियानांतर्गत हिंगणघाट पोलिस स्टेशनच्या पथकाने विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पद्माकर मुंडे, पीएसआय हरिहर सोनकुसरे, पोलिस हवालदार प्रवीण बोधाने, स्वप्निल जीवने आणि पोलिस अंमलदार सागर समृतवार यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले.

या अभियानांतर्गत हिंगणघाट येथील जी. बी. एम. एम. हायस्कूल, रा. सु. बिडकर महाविद्यालय, आंबेडकर विद्यालय, लिटिल एंजल विद्यालय, जीएसएम ॲकडमी, कृष्णराव झोटिंग पाटील विद्यालय तसेच शहरातील स्पोर्ट्स अकॅडमीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना फिशिंगद्वारे होणारी फसवणूक, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, सोशल मीडिया अकाउंट हॅकिंग, ओटीपी चोरी, डेबिट व क्रेडिट कार्ड फसवणूक, लॉटरीच्या आमिषातून होणारी फसवणूक तसेच ऑनलाइन व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सायबर गुन्ह्यांची माहिती देण्यात आली.

सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मजबूत पासवर्ड तयार करावा आणि तो नियमित बदलावा, ओटीपी, एटीएम पिन, पासवर्ड किंवा बँक खात्याशी संबंधित कोणतीही गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करताना काळजी घ्यावी, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये तसेच ऑनलाइन व्यवहार करताना सतर्कता बाळगावी, अशा सूचना पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्या.

सायबर गुन्हा घडल्यास त्वरित सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधून तक्रार नोंदविण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांना करण्यात आले. वेळेत तक्रार केल्यास फसवणुकीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यास मदत होऊ शकते, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हिंगणघाट पोलिस ठाण्याचे ठाणेदार अनिल राऊत यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक पद्माकर मुंडे, पीएसआय हरिहर सोनकुसरे, पोलिस हवालदार प्रवीण बोधाने, स्वप्निल जीवने आणि सागर समृतवार यांनी सहकार्य केले.

सायबर गुन्ह्यांबाबत विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली जागरूकता भविष्यात सुरक्षित डिजिटल व्यवहारांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे पोलिस विभागाने सांगितले.





  Print






News - Wardha




Related Photos