महत्वाच्या बातम्या

 मानेगाव/सडक येथे चिखलात घसरून पाणीपुरवठा कर्मचाऱ्याचा मृत्यू : रस्ता बांधकामाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह


- सर्व्हिस रोडअभावी अपघाताचा आरोप; बांधकाम कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी

विदर्भ न्यूज एक्सरेस 
प्रतिनिधी / भंडारा : लाखनी तालुक्यातील मानेगाव/सडक येथे सुरू असलेल्या रस्ता बांधकामातील कथित निष्काळजीपणामुळे एका पाणीपुरवठा कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी २० सायंकाळी सुमारे ६:४५ वाजता ही दुर्घटना घडली. रस्त्यालगत साचलेल्या चिखलातून जात असताना पाय घसरून पडल्याने चुडामणी धनराज कंकलवार ३२ वर्षंर, रा. सेलोटी यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर मानेगाव आणि सेलोटी परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची भावना असून, संबंधित बांधकाम कंपनीवर गुन्हा दाखल करावा तसेच मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

आरओ वॉटर प्लांटकडे जाताना घडला अपघात -
मिळालेल्या माहितीनुसार, चुडामणी कंकलवार हे गावातील आरओ वॉटर प्लांट सुरू करण्यासाठी नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी घरून निघाले होते. सुमारे ६:४५ वाजताच्या सुमारास ते गुलाब बाबा हॉटेलसमोरील रस्त्यावरून जात होते.

या ठिकाणी रस्ता बांधकामामुळे मोठ्या प्रमाणात चिखल साचला होता. त्याच चिखलातून जात असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते जोरात जमिनीवर कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करून त्यांना उपचारासाठी भंडारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

अंडरपासच्या कामामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर -
मानेगाव/सडक येथे अंडरपासचे बांधकाम सुरू आहे. या कामामुळे परिसरातील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, रस्ता अरुंद झाल्याने वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्ता बांधकाम करणाऱ्या संबंधित कंपनीने नागरिकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक असलेला सर्व्हिस रोड तयार केलेला नाही. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून, या दुर्घटनेलाही बांधकामातील नियोजनाच्या अभावामुळे कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

कुटुंबाचा आधार हरपला -
चुडामणी कंकलवार हे मनमिळाऊ, कष्टाळू आणि सेवाभावी स्वभावामुळे परिसरात परिचित होते. पाणीपुरवठा सेवेशी संबंधित काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांचे वडील धनराज कंकलवार हे पक्षाघातामुळे अंथरुणाला खिळले आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी चुडामणी यांच्या खांद्यावर होती. त्यांच्या अचानक निधनामुळे आई, आजारी वडील, दोन बहिणी आणि एक भाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सेलोटी येथे अंत्यसंस्कार; परिसरात शोककळा -
२१ जुलै रोजी सेलोटी येथील स्मशानभूमीत चुडामणी कंकलवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या निधनामुळे मानेगाव आणि सेलोटी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बांधकाम कंपनीवर कारवाईची मागणी -
या घटनेनंतर ग्रामस्थांनी संबंधित रस्ता बांधकाम कंपनीच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना न केल्याचा आरोप करत कंपनीवर गुन्हा दाखल करावा, तसेच मृताच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, रस्ता बांधकामादरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होऊ नये आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos