आषाढी यात्रेसाठी गोंदिया जिल्ह्यातून सात एसटी बसेस रवाना

- गोंदिया आगाराच्या चार, तर तिरोडा आगाराच्या तीन बसेस यवतमाळ-पुसदला; गुरुवारी पंढरपूरसाठी चार विशेष बसेस सुटणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठूमाऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विशेष नियोजन केले आहे. त्याअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातून एकूण सात एसटी बसेस यवतमाळ आणि पुसद आगारासाठी रवाना करण्यात आल्या आहेत. या बसेस तेथील गर्दीच्या काळात भाविकांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणार आहेत.
यंदा आषाढी एकादशी २५ जुलै रोजी येत असून, पंढरपूर येथे मोठी यात्रा भरणार आहे. जिल्ह्यातून थेट पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या तुलनेने कमी असली तरी नागपूरपासून पुढे मोठ्या प्रमाणात भाविक या यात्रेत सहभागी होतात. त्यामुळे गर्दीच्या आगारांना अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन एसटी महामंडळाकडून करण्यात येते.
महामंडळाच्या आदेशानुसार यंदा गोंदिया आगाराला चार, तर तिरोडा आगाराला तीन बसेस पाठविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार तिरोडा आगारातील दोन बसेस पुसद आगाराकडे, तर एक बस यवतमाळ आगाराकडे पाठविण्यात आली आहे. तसेच गोंदिया आगारातील चारही बसेस यवतमाळ आगाराकडे रवाना करण्यात आल्या आहेत.
आषाढी यात्रेला सोमवार २० पासून सुरुवात झाली असून, सप्तमीनंतर भाविकांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. २१ जुलै रोजी अष्टमी असल्याने यात्रेतील गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन गोंदिया आणि तिरोडा आगारांनी आपल्या सातही बसेस मंगळवारी २१ रवाना केल्या.
२२ व २३ जुलै रोजी नवमी असून विविध ठिकाणी रिंगण सोहळे होणार आहेत. त्यानंतर २५ जुलै रोजी आषाढी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. एकादशीच्या दिवशी दर्शन घेतल्यानंतर भाविक परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात. त्यानुसार या बसेस भाविकांना घेऊन परतीच्या मार्गावर निघतील आणि २९ जुलैपर्यंत संबंधित आगारात पोहोचण्याची शक्यता आहे.
पंढरपूरसाठी थेट चार बसेसची सुविधा -
दरम्यान, एसटी महामंडळाने गोंदिया आणि तिरोडा आगाराला प्रत्येकी दोन बसेस थेट पंढरपूर यात्रेसाठी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी २३ दोन्ही आगारांतून प्रत्येकी दोन अशा एकूण चार विशेष बसेस पंढरपूरकडे रवाना होणार आहेत.
या बसेस थेट पंढरपूरपर्यंत जाणार असल्याने पंढरीच्या यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी ही मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. भाविकांना प्रवासासाठी सोयीचे साधन मिळणार असून, त्यांनी या विशेष बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.
News - Gondia




Petrol Price




