महत्वाच्या बातम्या

 दुर्गापूर परिसरात गोवंशाची अमानुष वाहतूक उघड : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तिघांवर गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गोवंशीय जनावरांची कत्तलीच्या उद्देशाने अमानुषपणे वाहतूक करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ७ गोवंशीय जनावरे व टाटा-२०७ वाहनासह एकूण ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांविरुद्ध विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाला मंगळवारी २१ गोपनीय माहिती मिळाली की, दुर्गापूर हद्दीतून पद्मापूर मार्गे रहमतनगर येथे गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक केली जात आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पथकाने मौजा पद्मापूर येथे सापळा रचून नाकाबंदी केली.

नाकाबंदी दरम्यान संशयित टाटा-२०७ वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनात ५ गाई व २ बैल असे एकूण ७ गोवंशीय जनावरे अत्यंत दाटीने कोंबून, त्यांचा अमानुष छळ करत वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. जनावरांची अवस्था पाहता पोलिसांनी तातडीने वाहन ताब्यात घेत सर्व जनावरांची सुटका केली.

बचाव करण्यात आलेल्या गोवंशीय जनावरांना सुरक्षिततेच्या दृष्टीने प्यार फाउंडेशन, चंद्रपूर येथे सुपूर्द करण्यात आले. तसेच वाहनासह जनावरे जप्त करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली.

या प्रकरणी आरोपी फिरोज युसुफ कुरेशी (रा. दुर्गापूर), शेख अश्फाक इमाम कुरेशी (रा. रहमतनगर) आणि सादिक याकुब कुरेशी (रा. रहमतनगर, ता. जि. चंद्रपूर) यांच्याविरुद्ध दुर्गापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९७६ मधील कलम ५(अ), ९ व ११, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६० मधील कलम ११(१)(घ), (ड), (च), (ज), भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३(५) तसेच मोटार वाहन अधिनियम कलम १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईत ७ गोवंशीय जनावरे अंदाजे किंमत १ लाख ५ हजार रुपये आणि टाटा-२०७ वाहन अंदाजे किंमत ५ लाख रुपये असा एकूण ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात उपविभाग मूल पथकाने केली.





  Print






News - Chandrapur




Related Photos