महत्वाच्या बातम्या

 पांढुर्णा–बेलोना मार्गावरून सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथून नागपूर व अमरावती जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. ही वाहतूक प्रामुख्याने पांढुर्णा–बेलोना मार्गे रात्री उशिरा तसेच पहाटेच्या सुमारास केली जात असल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकाराकडे नरखेड पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, या मार्गावरील मोवाड येथे पोलिसांची चौकी कार्यरत असतानाही अवैध वाहतुकीवर प्रभावी कारवाई होत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दररोज लाखो रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू या मार्गाने नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांत पोहोचत असल्याचा दावा केला जात आहे.

अल्पवयीन व तरुणांचा वापर केल्याचा आरोप -

सूत्रांच्या माहितीनुसार, तंबाखू माफियांकडून या बेकायदेशीर व्यवसायासाठी अल्पवयीन तसेच बेरोजगार तरुणांना पैशांचे आमिष दाखवून वाहतुकीसाठी वापरले जात आहे. त्यामुळे या तरुणांचे भविष्य धोक्यात येत असून, गुन्हेगारीकडे त्यांची ओढ वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

युवकाला पकडूनही सोडल्याची चर्चा -

सुमारे आठ दिवसांपूर्वी मदना–जलालखेडा मार्गावर एका होमगार्ड जवानाने अवैध सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका युवकाला पकडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यानंतर एका पोलिस कर्मचाऱ्याने फोन करून संबंधित युवकाला सोडण्यास सांगितल्याची खात्रीशीर माहिती असल्याचा दावा केला जात आहे. या घटनेमुळे काही पोलिस कर्मचारी आणि तंबाखू माफिया यांच्यात साटेलोटे असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.

चौकशीची मागणी -

या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून निष्पक्ष चौकशी करून अवैध तंबाखू वाहतुकीमागील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच या अवैध साखळीत सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पाठीशी घालण्यात येऊ नये, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos