महत्वाच्या बातम्या

 गिरड व्याघ्र प्रकल्पातील दहशत निर्माण करणारी वाघीण अखेर जेरबंद : सहा गावांतील नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : गिरड व्याघ्र प्रकल्प परिसरात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या एका मादी वाघिणीला वनविभागाने यशस्वी आणि धाडसी रेस्क्यू मोहिमेद्वारे अखेर जेरबंद केले. रविवारी १९ जुलै पहाटे सुमारे ६ वाजता ही कारवाई करण्यात आली.

वाघिणीला सुरक्षितरीत्या पिंजऱ्यात पकडून पुढील व्यवस्थेसाठी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

वनविभागाच्या या यशस्वी मोहिमेमुळे पिंपळगाव, उंदीरगाव, साखरा, जोगिंगुफा तसेच परिसरातील अन्य गावांतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या वाघिणीच्या हालचालींमुळे मागील काही दिवसांपासून सहा गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही वाघीण गिरड व्याघ्र प्रकल्पातील गिरडची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघिणीच्या दोन वर्षांपूर्वी जन्मलेल्या पिल्लांपैकी एक आहे. अन्नाच्या शोधात ती वारंवार गावालगतच्या भागात येत होती. या काळात तिने अनेक पाळीव जनावरांवर हल्ले करून काही जनावरे ठार केली, तर काहींना जखमी केले. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

वाघिणीच्या वाढत्या वावराची गंभीर दखल घेत आमदार समीर कुणावार यांच्या सूचनेनुसार उपवनसंरक्षक हरविरसिंह यांनी वाघिणीला पकडण्यासाठी आवश्यक परवानगी मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली. सहाय्यक वनसंरक्षक हरीश सरोदे यांनी प्रस्ताव सादर केला. आवश्यक मंजुरी मिळताच वनविभागाने वन्यजीव बचाव केंद्र, गोंदिया येथील एनएनटीआर (NTTR) रेस्क्यू टीमच्या सहकार्याने विशेष मोहीम हाती घेतली.

दीर्घ नियोजन, सातत्यपूर्ण पाहणी आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर अखेर १९ जुलै रोजी पहाटे वाघिणीला सुरक्षितरीत्या भूल देऊन पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. त्यानंतर तिला आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

या रेस्क्यू मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल ढोणे, कौस्तुभ गावंडे, अभिषेक खेडुलकर, गोंदिया येथील एनएनटीआर टीमचे शूटर आशिष रामटेके, डॉ. मेघराज तुलावी, प्रणित सूर, भीमाशंकर तेली, क्षेत्र सहाय्यक जी. पी. राऊत, वनरक्षक पी. डी. बेले, रमेश चौके, कोंडबा गुंडप्पा आणि अमोल पिसे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

वनविभागाच्या या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जंगलालगतच्या गावांमध्ये सतर्कता राखण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos