आरोग्य विभाग सज्ज : गावातच वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, १०३ भाविक पंढरपूर वारीसाठी रवाना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाने वारकऱ्यांसाठी विशेष आरोग्यसेवा सुरू केली असून, वारीला जाणाऱ्या प्रत्येक भाविकाची आरोग्य तपासणी गावातच करून मोफत औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत.
आरोग्य सेवा संचालनालयाच्या निर्देशानुसार प्रतिबंधात्मक, उपचारात्मक तसेच संदर्भ आरोग्यसेवा प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे यंदा गोंदिया जिल्ह्यातून एकूण १०३ वारकरी पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी रवाना होणार आहेत.
त्यापैकी २५ वारकरी दिंडीसोबत पायी जाणार असून, ७८ वारकरी बस आणि रेल्वेने पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. १९ जुलैपासून पुढील तीन ते चार दिवसांत हे वारकरी आपल्या सोयीनुसार प्रवासाला सुरुवात करणार आहेत. पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलेल्या वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, ग्रामीण भागातही वारीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि शासकीय आरोग्य संस्थांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. वारीला जाण्यापूर्वी प्रत्येक भाविकाने आरोग्य तपासणी करून घ्यावी, तसेच आवश्यक औषधे सोबत ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
तपासणीदरम्यान रक्तदाब, मधुमेह, ताप, संसर्गजन्य आजारांची लक्षणे तसेच इतर आरोग्यविषयक तक्रारींची तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत औषधे दिली जात आहेत.
पंढरपूर यात्रेसाठी जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने विशेष बससेवा उपलब्ध करून दिली आहे. गोंदिया आणि तिरोडा आगारातून विशेष बसेस सोडण्यात येत असून, बस आणि रेल्वेने जाणाऱ्या वारकऱ्यांनाही आरोग्य तपासणी करूनच प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
जिल्ह्यातून पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांची संख्या तुलनेने कमी असली तरी ग्रामीण भागातील अनेक भाविक दरवर्षी पंढरपूर यात्रेत सहभागी होतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच गरज भासल्यास आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि रुग्णवाहिकेची सुविधाही सज्ज ठेवण्यात आली आहे.
जिल्हा आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, वारीपूर्वीच आरोग्य तपासणी आणि औषधोपचार केल्यास प्रवासादरम्यान होणाऱ्या अनेक आरोग्य समस्यांपासून बचाव होऊ शकतो. त्यामुळे सर्व वारकऱ्यांनी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन मोफत तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल यांनी सांगितले की, आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या जिल्ह्यातील सर्व वारकऱ्यांनी वारीला जाण्यापूर्वी आरोग्य तपासणी करून घ्यावी. आरोग्य पथके पूर्णपणे सज्ज असून, जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत तपासणी व औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान, खोबा-कोकणा येथील वारकरी हभप मुक्ताबाई हत्तीमारे यांनी सांगितले की, पांडुरंगाच्या भेटीची ओढ प्रत्येक वारकऱ्याला असते. माझ्या वडिलांच्या प्रेरणेतून आमच्या घराण्यातील तिसरी पिढी वारी करीत आहे. वारीला जाण्यापूर्वी आम्ही सर्वजण आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधे सोबत घेतो.
वारीदरम्यान भाविकांचे आरोग्य अबाधित राहावे आणि पंढरपूरचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने केलेली ही पूर्वतयारी महत्त्वाची ठरत असून, आरोग्य तपासणी, औषधोपचार, औषधसाठा आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवांमुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
News - Gondia




Petrol Price




