रस्ते गावांना जोडतात; पण शिक्षण माणसाला ध्येयप्राप्तीशी जोडते : आ. सुधीर मुनगंटीवार


- आंबेधानोरा येथील नूतन आदर्श शाळा इमारतीचे लोकार्पण; शिक्षण, संस्कार आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : रस्ते गावांना जोडतात; मात्र शिक्षण माणसाला त्याच्या ध्येयप्राप्तीशी जोडते. शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्याचे सर्वात प्रभावी साधन असून, शाळा ही केवळ विटा-सिमेंटची इमारत नसून ज्ञान, संस्कार, स्वप्ने आणि कर्तृत्व घडविणारे पवित्र ज्ञानमंदिर आहे, असे प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोंभुर्णा तालुक्यातील आंबेधानोरा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या नूतन आदर्श शाळा इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने पारंपरिक पद्धतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर शाळा परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. नूतन शाळा इमारतीचे लोकार्पण आमदार मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अलका आत्राम, भाजप तालुका अध्यक्ष हरीश ढवस, राहुल संतोषवार, पोंभुर्णा नगराध्यक्षा सुलभा पिपरे, उपनगराध्यक्ष अजित मंगळगिरीवार, विनोद देशमुख, ज्योती बुरांडे, आंबेधानोरा सरपंच निरंजना मडावी, माजी सरपंच सिताराम मडावी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश जुमनाके, गुरुदास पिपरे, गटविकास अधिकारी नमिता बांगर, कार्यकारी अभियंता प्रदीप बाराहाते, उपअभियंता सुनील मेश्राम, गटशिक्षणाधिकारी धनराज आवारी, मुख्याध्यापक तुकडोजी आलाम यांच्यासह ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या बळावर यश संपादन करावे -
आपल्या मार्गदर्शनात आमदार मुनगंटीवार म्हणाले की, या शाळेत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने मोठी स्वप्ने पाहावीत आणि जिद्द, मेहनत व गुणवत्तेच्या बळावर ती पूर्ण करावीत. विद्यार्थ्यांनी आपल्या यशातून आई-वडिलांचे, गावाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये अमर्याद क्षमता असून ते कोणत्याही कॉन्व्हेंटमधील विद्यार्थ्यांइतकेच नव्हे, तर त्याहून अधिक यशस्वी होऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांचे यश हे शाळेच्या नावावर नव्हे, तर त्यांच्या परिश्रम, जिद्द आणि गुणवत्तेवर अवलंबून असते, असे ते म्हणाले.
आई हीच पहिली गुरु; शिक्षणातून समाजसेवेची प्रेरणा घ्या -
जीवनातील पहिली आणि सर्वोत्तम गुरु म्हणजे आई असल्याचे सांगत आमदार मुनगंटीवार यांनी तिच्या संस्कारातूनच व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असल्याचे नमूद केले. शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि संत गाडगेबाबा यांच्या कार्याचा उल्लेख केला. सावित्रीबाई फुले आणि संत गाडगेबाबा यांच्या नावाने विद्यापीठांना नामकरण व्हावे, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केल्याचेही त्यांनी सांगितले.
मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी व्हावा आणि मला काय मिळेल? या विचाराऐवजी मी समाजासाठी काय करू शकतो? ही भावना प्रत्येक विद्यार्थ्याने आणि नागरिकाने जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.
जनतेच्या प्रत्येक रास्त मागणीला न्याय देण्याचा प्रयत्न -
आंबेधानोरा गावाच्या दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी खराब रस्त्याबाबत समस्या मांडली होती. त्याची तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आणि रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे आज ग्रामस्थांना सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. जनतेच्या प्रत्येक रास्त मागणीची संवेदनशीलतेने दखल घेऊन ती मार्गी लावणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर भर -
मतदारसंघाच्या विकासाचा आढावा घेताना आमदार मुनगंटीवार म्हणाले की, जनतेने दिलेल्या विश्वासामुळे विधानसभेत शेवटच्या घटकाच्या न्याय आणि हक्कासाठी सातत्याने आवाज उठविता आला. शेतकऱ्यांना धान बोनस मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अनेक शाळांचा विकास करण्यात आला असून ज्यूबली शाळेचा कायापालट करण्यात आला आहे. पोंभुर्णा, बल्लारपूर, मुल आणि चंद्रपूर येथे आधुनिक वाचनालयांची उभारणी, उमरी पोतदार येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती तसेच विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत.
मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हा अखंड सुरू राहणारा प्रवास असून शिक्षण, आरोग्य, शेती आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाद्वारे विकासाची गती अधिक वेगवान करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
News - Chandrapur




Petrol Price




