महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूरच्या पीक विमा हप्ता दरांबाबत आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीची शासनाकडून गंभीर दखल


- मुख्यमंत्र्यांचे कृषी सचिवांना अहवाल सादर करण्याचे निर्देश; २८ जुलै रोजी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : खरीप हंगाम २०२६ साठी चंद्रपूर जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या पीक विमा हप्ता दरांबाबत शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी सचिवांना संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

याच पार्श्वभूमीवर २८ जुलै २०२६ रोजी मुंबई येथे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील पीक विमा हप्ता दरातील विसंगतीबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेजारील जिल्ह्यांपेक्षा चंद्रपूरचे दर अधिक -
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निदर्शनास आणून दिले की, खरीप हंगाम २०२६ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील भात, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी निश्चित करण्यात आलेले पीक विमा हप्ता दर शेजारील गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक आहेत. समान भौगोलिक परिस्थिती, हवामान, पर्जन्यमान आणि पीकपद्धती असतानाही केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अधिक आर्थिक भार टाकणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी शासनाकडे ठामपणे मांडले.

फेरविचार आणि मुदतवाढीची मागणी -
आ. मुनगंटीवार यांनी शासनाकडे चंद्रपूर जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या पीक विमा हप्त्याचा तातडीने फेरविचार करून शेजारील जिल्ह्यांप्रमाणे वाजवी दर लागू करण्याची मागणी केली आहे. याशिवाय, सुधारित दर निश्चित होईपर्यंत पीक विमा भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात यावी, जेणेकरून कोणताही शेतकरी पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, अशीही त्यांनी मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांची तातडीने दखल -
आ. मुनगंटीवार यांच्या निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी सचिवांना संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शासन स्तरावर या विषयावर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

२८ जुलैच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष -
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत २८ जुलै रोजी मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्याच्या पीक विमा हप्ता दरातील विसंगतीवर सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल आणि वाढीव विमा हप्ता दरात सुधारणा होईल, अशी अपेक्षा जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत त्यांच्या प्रश्नांसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, आगामी बैठकीतील निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos