महत्वाच्या बातम्या

 ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता डोमिसाइल अनिवार्य : १ ऑगस्टपासून नवे नियम लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्यातील वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढविण्यासह रस्ता सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. प्रस्तावित नियमांनुसार, महाराष्ट्रात नवीन ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी अर्जदाराला महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) सादर करणे बंधनकारक केले जाण्याची शक्यता असून, ही नियमावली १ ऑगस्ट २०२६ पासून लागू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

यासोबतच राज्यात वाढत असलेल्या बाइक टॅक्सी सेवांना शिस्त लावण्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचे कामही आरटीओ प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

अद्याप अधिकृत आदेश नाहीत -

ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि सुरक्षितता आणण्याच्या उद्देशाने हा प्रस्ताव तयार करण्यात आला असला, तरी याबाबत राज्य शासनाचा किंवा परिवहन विभागाचा अधिकृत आदेश अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे नियम लागू होण्याबाबत अंतिम निर्णय शासनाच्या अधिसूचनेनंतरच स्पष्ट होणार आहे.

दरवर्षी हजारो नवीन परवाने -
चंद्रपूर जिल्ह्यात दरवर्षी शिकाऊ (लर्निंग) आणि कायमस्वरूपी (पक्के) अशा हजारो ड्रायव्हिंग लायसन्सचे वितरण केले जाते. वाहनांची संख्या वाढत असल्याने नवीन परवाना धारकांची संख्याही सातत्याने वाढत आहे. प्रस्तावित नियम लागू झाल्यास नवीन लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रथम डोमिसाइल प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

डोमिसाइल प्रमाणपत्र म्हणजे काय?
डोमिसाइल किंवा अधिवास प्रमाणपत्र हा राज्य शासनाकडून दिला जाणारा अधिकृत दस्तऐवज असून, संबंधित व्यक्ती महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी असल्याचे त्याद्वारे प्रमाणित केले जाते. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्जदाराने साधारणपणे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्यास असल्याचा पुरावा सादर करावा लागतो.

नवीन नियमांमध्ये काय बदल?
प्रस्तावित नियमांनुसार, नवीन शिकाऊ किंवा कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करताना केवळ आधार कार्ड, वीज बिल किंवा इतर पत्त्याचा पुरावा पुरेसा ठरणार नाही. अर्जदार महाराष्ट्राचा अधिकृत रहिवासी असल्याचे सिद्ध करण्यासाठी डोमिसाइल प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. यामुळे खोट्या किंवा तात्पुरत्या पत्त्यावरून ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्याच्या प्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा आहे.

निर्णयामागील कारण काय?
अनेकदा परराज्यातील व्यक्ती तात्पुरत्या पत्त्याच्या आधारे महाराष्ट्रातून वाहन परवाना मिळवित असल्याचे निदर्शनास आले आहे. अपघात किंवा गुन्हेगारीच्या घटनांमध्ये अशा व्यक्तींचा शोध घेणे तपास यंत्रणांसाठी कठीण ठरते. तसेच राज्यातील रहिवाशांची अचूक माहिती आरटीओकडे उपलब्ध राहावी आणि तपास यंत्रणांना आवश्यक माहिती सहज मिळावी, हा या प्रस्तावित बदलामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

नवीन नियम कोणासाठी?
प्राथमिक माहितीनुसार, हा नियम केवळ नवीन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्यांनाच लागू होईल. ज्यांच्याकडे आधीपासून वैध ड्रायव्हिंग लायसन्स आहे, त्यांना लायसन्स नूतनीकरण (रिन्यूअल) किंवा पत्ता बदलताना सध्या तरी डोमिसाइल प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती असणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

भाडेकरूंसाठीही मार्ग खुला- 
भाड्याच्या घरात राहणाऱ्या किंवा स्वतःचे घर नसलेल्या नागरिकांनाही डोमिसाइल प्रमाणपत्र मिळू शकते. त्यासाठी संबंधित शहरात किंवा राज्यात किमान १५ वर्षे वास्तव्यास असल्याचे पुरावे, जसे की सलग भाडेकरार, शैक्षणिक दाखले, गॅस कनेक्शन किंवा इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. योग्य कागदपत्रांच्या आधारे अशा नागरिकांनाही ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकणार आहे.

डोमिसाइल कसे काढावे?
डोमिसाइल प्रमाणपत्रासाठी नागरिकांना राज्य शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येतो. तसेच जवळच्या सेतू केंद्र किंवा महा-ई-सेवा केंद्रातूनही अर्ज करता येतो. अर्जासाठी वयाचा पुरावा (टीसी किंवा जन्मदाखला), पत्त्याचा पुरावा (रेशन कार्ड, वीज बिल, मतदार ओळखपत्र), महाराष्ट्रात १५ वर्षे वास्तव्यास असल्याचा पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच स्वघोषणापत्र आदी कागदपत्रांची आवश्यकता असते.

बाइक टॅक्सीसाठीही नवी नियमावली -
राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बाइक टॅक्सी सेवांवर नियंत्रण आणण्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. यामुळे बाइक टॅक्सी सेवा अधिक नियमनबद्ध आणि सुरक्षित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे समजते.





  Print






News - Chandrapur




Related Photos