महत्वाच्या बातम्या

 एलसीबीचा करारी घाव : शेतकऱ्यांच्या शेतीसाहित्यावर डल्ला मारणारा सराईत आरोपी जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीसाहित्य व कृषी अवजारांवर डल्ला मारणाऱ्या सराईत चोरट्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेले शेती साहित्य, कृषी अवजारे आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन असा एकूण ९ लाख ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शिवराज चिनकन वेलपुरी वय ३९  वर्ष रा. राजीव गांधी नगर, आझाद चौक, चंद्रपूर असे मुख्य आरोपीचे नाव असून आकाश हरिदास बेले रा. भद्रावती, राजू वीरशपा स्वामीशेट्टी रा. गडचांदूर आणि रवी दगडुजी गदाई रा. इंदिरानगर, चंद्रपूर हे आरोपी फरार आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या वरोरा व राजुरा उपविभागाच्या पथकाने १४ जुलै २०२६ रोजी कोसारा पडोली मार्गावर नाकाबंदी केली असता शिवराज चिनकन वेलपुरी वय ३९ वर्ष रा. राजीव गांधी नगर, आझाद चौक, चंद्रपूर याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीदरम्यान आरोपीने जिल्ह्यातील विविध भागांत शेतीसाहित्य चोरी केल्याची कबुली दिली.

तपासादरम्यान आरोपीकडून वरोरा, बल्लारपूर, गडचांदूर आणि राजुरा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या एकूण पाच चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. या गुन्ह्यांमध्ये वरोरा पोलीस ठाणे (गुन्हा क्र. ८०३/२०२६), बल्लारपूर पोलीस ठाणे (गुन्हा क्र. ६८८/२०२६), गडचांदूर पोलीस ठाणे (गुन्हा क्र. ३४७/२०२६ व ३८६/२०२६) आणि राजुरा पोलीस ठाणे (गुन्हा क्र. ६००/२०२६) यांचा समावेश आहे.

आरोपीकडून २ लाख ५१ हजार ५०० रुपयांचे शेती साहित्य व कृषी अवजारे तसेच चोरीच्या मालाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली महिंद्रा बुलेरो क्रं एमएच ३४ सीक्यू १३१० किंमत ७ लाख रुपये जप्त करण्यात आली. असे एकूण ९ लाख ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, सहायक पोलीस निरीक्षक दिपक कांक्रेडवार, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा किशोर वैरागडे, अजय बागेसर, संतोष येलपुलवार, शरद कुडे, जयसिंग, विठ्ठल काकडे, चापोहवा दिनेश अराडे, पोअं गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, सचिन गुरनुले, प्रफुल्ल पुप्पलवार, चापोअं ऋषभ बारसिंगे यांनी केले.

पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू ठेवला असून, जिल्ह्यातील शेतीसाहित्य चोरीच्या इतर घटनांशीही या टोळीचे संबंध आहेत का, याचाही तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos