महत्वाच्या बातम्या

 प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्सचा मनमानी कारभार : मुख्य मार्गावर बेकायदा थांबे, अपघाताचा धोका वाढला


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील मुख्य मार्ग, बसस्थानक परिसर आणि रेल्वे चौकात खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी कारभारामुळे वाहतूक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोणताही प्रवासी हात दाखवताच ट्रॅव्हल्स थेट मुख्य रस्त्यावर थांबत असल्याने मागून येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक लावावे लागत आहेत. त्यामुळे दररोज अपघाताची शक्यता निर्माण होत असून वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शहरातील प्रमुख मार्गावर दिवसभर हजारो वाहने धावत असतात. अशा वर्दळीच्या रस्त्यावर ट्रॅव्हल्स कोणत्याही ठिकाणी थांबून प्रवासी चढविणे-उतरणे सुरू असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो. अचानक थांबणाऱ्या वाहनांमुळे मागील वाहनांची साखळी तयार होत असून किरकोळ अपघात टळत असले तरी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

विशेषतः बसस्थानकाजवळ अनेक ट्रॅव्हल्स थांबत असल्याने परिसरात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते. नियमानुसार बसस्थानकापासून ठरावीक अंतरावरच खासगी ट्रॅव्हल्सना प्रवासी घेणे-उतरण्याची परवानगी असताना त्याचे पालन होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेलाही अडथळा निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे.

याशिवाय काही ट्रॅव्हल्सचे एजंट थेट बसस्थानक परिसरात प्रवेश करून प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्समध्ये बसण्यासाठी आग्रह करत असल्याचेही चित्र आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून बसस्थानकातील शिस्तही बिघडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. 

रेल्वे चौकात आलापल्ली व मुलचेरा मार्गावरील ट्रॅव्हल्स रस्त्याच्या मधोमध उभ्या करून प्रवासी घेतले जात असल्याचेही निदर्शनास येत आहे. चौक हा आधीच वाहतुकीच्या दृष्टीने संवेदनशील असून अशा प्रकारामुळे अपघाताचा धोका अधिक वाढत आहे.

या संपूर्ण प्रकाराकडे प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ट्रॅव्हल्स चालक, मालक आणि एजंटांवर कठोर कारवाई करावी, तसेच बसस्थानक आणि मुख्य मार्गांवरील बेकायदा थांबे त्वरित बंद करावेत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos