हरविलेल्या १,१५५ बालकांचा यशस्वी शोध : चंद्रपूर पोलिसांच्या ऑपरेशन शोध व ऑपरेशन मुस्कानला मोठे यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी हरविलेल्या व पळविण्यात आलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राबविलेल्या ऑपरेशन शोध आणि ऑपरेशन मुस्कान या विशेष मोहिमांना उल्लेखनीय यश मिळाले आहे. सन २०२१ ते मे २०२६ या कालावधीत जिल्ह्यात हरविलेल्या अथवा पळविलेल्या १,१७६ बालकांच्या प्रकरणांची नोंद झाली. त्यापैकी १,१५५ बालकांचा यशस्वी शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले, तर उर्वरित २१ प्रकरणांमध्ये शोधकार्य सुरू असल्याची माहिती पोलिस विभागाने दिली.
हरविलेल्या प्रत्येक बालकाचा शोध घेणे हे चंद्रपूर पोलिसांचे सर्वोच्च प्राधान्य असून, अपर पोलीस महासंचालक, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यासाठी ट्रॅकचाइल्ड (TrackChild) पोर्टल, CCTNS प्रणाली, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल तांत्रिक तपास, माहितीदारांचे जाळे तसेच इतर राज्यांतील पोलिसांशी समन्वय साधून हरविलेल्या व पळविलेल्या बालकांचा शोध घेतला जात आहे.
बालक, महिला आणि पुरुष हरविल्याच्या प्रकरणांचा तपास अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात हरविलेल्या व्यक्ती शोध कक्ष (Missing Cell) स्थापन करण्यात आला आहे. तसेच मानव तस्करी प्रतिबंधक कक्ष (AHTU) यांच्या माध्यमातून तांत्रिक तपास, माहिती संकलन, विविध राज्यांतील पोलिसांशी समन्वय आणि विशेष शोधमोहीम सातत्याने राबविण्यात येत आहेत.
पोलिसांच्या विश्लेषणानुसार, बालके घरातून निघून जाण्यामागे प्रेमसंबंध, सोशल मीडियाचा अतिवापर, ऑनलाईन मैत्रीमधील फसवणूक, तसेच कौटुंबिक वाद आणि मानसिक तणाव ही प्रमुख कारणे आढळून आली आहेत.या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पालकांना आपल्या पाल्यांशी नियमित संवाद ठेवण्याचे, त्यांच्या मित्रपरिवार आणि सोशल मीडिया वापरावर लक्ष ठेवण्याचे, त्यांच्या मानसिक स्थितीची जाण ठेवून विश्वासाचे नाते निर्माण करण्याचे तसेच कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास त्वरित शिक्षक किंवा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
वर्षनिहाय आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये २२६ पैकी २२४, २०२२ मध्ये २४१ पैकी २४०, २०२३ मध्ये २३२ पैकी २३०, २०२४ मध्ये १८६ पैकी १८२, २०२५ मध्ये १९६ पैकी १९३ आणि मे २०२६ पर्यंत ९५ पैकी ८६ बालकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
हरविलेल्या बालकांचा शोध, त्यांचे सुरक्षित पुनर्वसन आणि जनजागृती या तिन्ही स्तरांवर चंद्रपूर पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरू असून, नागरिकांनीही संशयास्पद हालचाली अथवा हरविलेल्या बालकांबाबतची माहिती तातडीने पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




