जिल्हा परिषद शाळा पुसुकपल्ली येथे नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत


- आलापल्ली वनविभागाच्या उपवनसंरक्षक दिपाली. आर. तलमले मॅडम यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत.
- ढोल-ताशांच्या गजरात बैलबंडीवरून गावात काढली भव्य मिरवणूक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : राज्यभरात आज नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होताच पंचायत समिती अहेरी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा पुसुकपल्ली येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण व्हावी, शाळेविषयी आत्मीयता वाढावी आणि पालकांमध्ये सकारात्मक संदेश जावा या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाला उपवनसंरक्षक दिपाली.आर. तलमले मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, टिळा लावून व शालेय साहित्य देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांची सजविलेल्या बैलबंडीवर बसवून ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांनी मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करत विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
शाळेने आयोजित केलेल्या या अभिनव प्रवेशोत्सवामुळे नवागत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत होता. पहिल्याच दिवशी शाळेचे वातावरण उत्सवमय झाल्याने विद्यार्थ्यांमधील भीती दूर होऊन शाळेविषयी आत्मीयता निर्माण झाली. पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये शिक्षणाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन तयार होतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रागीवार मॅडम, व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद भोयर, व समितीचे सदस्य, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेण्याचे, शिस्तीचे पालन करण्याचे आणि उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या आगळ्यावेगळ्या स्वागत सोहळ्यामुळे संपूर्ण पुसुकपल्ली गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांचा उत्साह हा सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला.
News - Gadchiroli




Petrol Price




