महत्वाच्या बातम्या

 बामणी येथे भीषण अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्ती ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बामणी टी-पॉईंटजवळ शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, २७ जून रोजी रात्री सुमारे ९.१५ वाजता बामणी येथील पोलीस पाटील मोटारसायकलने बामणी टी-पॉईंटकडे जात असताना बामणी-कोठारी मार्गावरील पुलाजवळ एक व्यक्ती रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेला दिसला. संबंधित व्यक्तीच्या डोक्याला गंभीर मार लागला होता आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली. जखमी व्यक्तीला ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून त्याच्या अंगात पांढरा मळकट शर्ट व काळी पँट होती. प्राथमिक तपासात अज्ञात वाहनाने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवत धडक दिल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. तसेच मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाह सयाम करीत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos