महत्वाच्या बातम्या

 जिल्हास्तर क्रीडा पुरस्कार २०२१-२०२२ करीता प्रस्ताव आमंत्रीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र शासनाचे क्रीडा धोरण २००१ अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे मार्फत जिल्ह्यातील उत्कृष्ठ क्रीडापटू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे/योगदानाचे मुल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत खेळाडू (पुरुष व महिला), दिव्यांग गुणवंत खेळाडू सन २०२१ - २०२२ या वर्षातील पुरस्कार वितरीत करावयाचा आहे.

पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम रु.१० हजार - असे आहे. त्या अनुषंगाने सन २०२०-२०२१ च्या पुरस्कारासाठी या कार्यालयामार्फत बंद लिफाफ्यात विहित नमुन्यातील परिपुर्ण प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

पुरस्काराचे निकष : (१) पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्षे वास्तव्य असले पाहिजे, (२) क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्षे महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केले असले पाहिजे व त्याने वयाची ३५ वर्षे पुर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकनाकरीता त्या जिल्ह्यातील खेळाडूंचीच कामगिरी ग्राह्य धरली जाईल, (३) दिव्यांग खेळाडू व गुणवंत खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपुर्व ५ वर्षापैकी २ वर्षे त्या जिल्ह्याचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे, (४) एका जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही, (५) एकदा एका खेळामध्ये किंवा एका प्रवर्गामध्ये जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त केलेली व्यक्ती पुन्हा त्याच खेळात किंवा प्रवर्गात जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळण्यास पात्र असणार नाही.

पुरस्कार वर्षाची गणना १ जुलै ते ३० जुन (३० जुन, २०२२ पर्यंत) असे राहील. उपरोक्त पुरस्काराकरीता अर्जासोबत सादर करण्यात आलेले प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे पुन्हा पुन्हा (अनेकवेळा) सादर करु नयेत. अर्जदाराने सादर केलेले कागदपत्रे व प्रमाणपत्र सत्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र / हमीपत्र प्रस्तावासोबत सादर करणे अनिवार्य असेल. गुणवंत क्रीडा मार्गदर्शकाकरीता खेळाडूनिहाय स्वतंत्र हमीपत्र देण्यात यावे. एक खेळाडू एका प्रशिक्षकाला एकदाच हमीपत्र देतील याची नोंद घ्यावी.

गडचिरोली जिल्ह्यातील पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करणारे खेळाडू/गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांनी पुरस्काराच्या अटी व शर्तीच्या अधिन राहुन विहित नमुन्यात बंद लिफाफ्यात आपला परिपुर्ण प्रस्ताव ११ जून २०२६पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे सादर करावे.

अर्जदार यांनी अधिक माहितीकरीता कार्यालयीन वेळेत संपर्क साधुन पुरस्काराचा विहित नमुना अर्ज प्राप्त करुन घ्यावा. जिल्ह्यातील अधिका अधिक खेळाडूंनी/क्रीडा मार्गदर्शकांनी आपले परिपुर्ण प्रस्ताव विहित वेळेत सादर करावे. उशिरा आलेल्या प्रस्तावांचा विचार करण्यात येणार नाही तरी गडचिरोली जिल्ह्यातील पात्र खेळाडू/क्रीडामार्गदर्शक यांनी जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करावे. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली, भास्कर घटाळे यांनी केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos