मद्दिगुडम गावातील विद्युत खांबांवरील दिवे अनेक दिवसांपासून बंद : ग्रामस्थांमध्ये नाराजी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत किष्टापूर (वेल) अंतर्गत येणाऱ्या मद्दिगुडम गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत खांबांवरील रस्ते दिवे बंद असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी गावात अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अपघाताची शक्यताही वाढली आहे.
सध्या पावसाळा सुरू झाल्याने गावातील रस्त्यांवर चिखलाचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी रस्ते दिवे बंद असल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना अधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः लहान मुलांना साप, विंचू तसेच इतर विषारी प्राण्यांचा धोका वाढला असून, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तसेच, पावसाळ्यात सर्पदंश व इतर दुर्घटनांची शक्यता अधिक असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत ग्रामस्थांनी संबंधित ग्रामसेवकाशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला असता, त्यांनी सोमवारपर्यंत गावातील विद्युत खांबांवरील लाईट लावण्यात येतील, असे आश्वासन दिले. मात्र, अनेक दिवसांपासून समस्या कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे ग्रामपंचायत किष्टापूर (वेल) प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गावातील विद्युत खांबांवरील दिवे त्वरित लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आता ग्रामसेवकांनी दिलेल्या आश्वासनानुसार सोमवारपर्यंत दिवे लावण्यात येणार का, याकडे मद्दिगुडम ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




