महत्वाच्या बातम्या

 विशेष रोजगार मेळाव्याचे ३० जून रोजी आयोजन : २३ रिक्त पदांसाठी मुलाखती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक-युवतींना खाजगी क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय विशेष रोजगार मेळावा (प्लेसमेंट ड्राईव्ह) आयोजित करण्यात आला आहे.

हा रोजगार मेळावा ३० जून २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेदरम्यान जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा क्रीडा संकुल, बसस्थानकाजवळ, भंडारा येथे होणार आहे.

मेळाव्यात अशोक लेलँड प्रा. लि., गडेगाव (लाखनी) आणि महाराष्ट्र मेटल प्रा. लि., मारेगाव (भंडारा) या दोन नामांकित कंपन्यांमध्ये उपलब्ध असलेल्या एकूण २३ रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

मेळाव्यात मुलाखत व इतर निवड प्रक्रियेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार असल्याने इच्छुकांनी बायोडेटा, शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत आणावे. उमेदवारांना मेळाव्याच्या दिवशीच ऑफलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त उमेदवारांनाही या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक युवक-युवतींनी तसेच गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त गावांतील उमेदवारांनी या रोजगाराच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी ०७१८४-२५२२५० या दूरध्वनी क्रमांकावर किंवा चेतन बागडे (मो. ८९९९०७०३२८) यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos