आलापल्लीत टेरेसवरील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : ६ जुगारी अटकेत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / अहेरी : आलापल्ली येथील एका घराच्या टेरेसवर सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर अहेरी पोलिसांनी धडक कारवाई करत ६ जुगाऱ्यांना रंगेहाथ अटक केली. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, पत्त्यांचे कॅट आणि अन्य साहित्य असा एकूण ३१ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवार, २७ मे रोजी दुपारी सुमारे १:३० वाजताच्या दरम्यान करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, अहेरी पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार खासगी वाहनाने परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत आलापल्ली येथील विजय अशोक गुप्ता यांच्या घराच्या टेरेसवर काही इसम ५२ पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हार-जीतचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ दोन पंचांना सोबत घेत कारवाईचे नियोजन केले. त्यानंतर संबंधित घराच्या टेरेसवर छापा टाकण्यात आला. टेरेसवरील सिमेंट पत्र्याच्या सावलीत बसून जुगार खेळत असताना पोलिसांनी आरोपींना रंगेहाथ पकडले.
या कारवाईत विजय अशोक गुप्ता (३६), सागर बाबूराव मद्देर्लावार ( ३३), मल्लेश लचय्या राजनालवार (वय ४१) (सर्व रा. आलापल्ली), संजय शंकर हिचामी (वय ३५, रा. नागेपल्ली), सुरेश नामदेव भोयर (३४, रा. मद्दीगुडम) आणि शाहरूख शफीक शेख ( ३४, रा. अहेरी) यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी आरोपींकडून जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारे पत्त्यांचे कॅट, १० हजार ६२० रुपये रोख रक्कम तसेच आरोपींच्या अंगझडतीदरम्यान २० हजार रुपये असा एकूण ३१ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पोलिस नाईक ज्ञानेश्वर सुरेश निलावार यांच्या तक्रारीवरून सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ च्या कलम १२ (अ) अन्वये अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अहेरी पोलीस करीत आहेत.
News - Gadchiroli




Petrol Price




