कारमधून २४५ लिटर डिझेलची वाहतूक : दोन शेतकऱ्यांविरुद्ध ईसीए अंतर्गत गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : विविध पेट्रोल पंपांवरून १० ते २० लिटरप्रमाणे डिझेल जमा करून एकूण २४५ लिटर डिझेल कारमधून वाहतूक करणाऱ्या दोन शेतकऱ्यांविरुद्ध सिंदेवाही पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू अधिनियम (ईसीए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत डिझेलसह कार असा एकूण १ लाख ७३ हजार ७६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई २५ ते २६ मेच्या मध्यरात्री सुमारे १.३० वाजता सिंदेवाही येथील शिवाजी चौकात नाकाबंदी दरम्यान करण्यात आली.
सध्या इंधनटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक पेट्रोल पंपांवर मर्यादित प्रमाणात इंधन विक्री केली जात आहे. काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २५ मे रोजी चंद्रपूर शहरातील पेट्रोल पंपांची अचानक तपासणी करून कॅन व बाटल्यांमध्ये पेट्रोल-डिझेल न देण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, सिंदेवाही पोलिसांकडून शिवाजी चौक परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू असताना सिंदेवाहीहून नागभीडकडे जाणारी वॅगनआर कार क्रं. एमएच-३२-सी-७०५९ ने संशयितरित्या आढळून आली. वाहन थांबवून तपासणी केली असता कारमध्ये दोन निळ्या कॅनमध्ये ९० लिटर, एका पांढऱ्या कॅनमध्ये ३० लिटर आणि तीन काळ्या कॅनमध्ये १२५ लिटर असे एकूण २४५ लिटर डिझेल आढळून आले.
याप्रकरणी पोलिसांनी नागभीड तालुक्यातील धामणगाव येथील दुर्गेश देवराव पर्वते (वय ३२) व वाढोणा येथील प्रफुल रामदास मस्के (वय ३८) यांच्याकडे कॅनमधील डिझेल वाहतुकीची परवानगी व आवश्यक कागदपत्रांची विचारणा केली. मात्र, त्यांनी समाधानकारक उत्तर देता न आल्याने पोलिसांनी डिझेल व अंदाजे दीड लाख रुपये किमतीची कार असा एकूण १ लाख ७३ हजार ७६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ व ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




