महत्वाच्या बातम्या

 रोजगार मेळाव्यात १३ उमेदवारांची प्राथमिक निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जिल्हयातील नोकरीइच्छुक युवक व युवतींकरीता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करून त्यांना खाजगी क्षेत्रातील नामांकित कंपन्याच्या माध्यमातून अधिक मागणी असलेल्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उददेशाने, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर व सायन्स कॉलेज पवनी यांच्या संयुक्त विद्यमाने २७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०९.०० ते दुपारी. २.०० या वेळेत सायन्स कॉलेज पवनी तह. पवनी भंडारा या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय विशेष रोजगार मेळावा (प्लेसमेंट ड्राईव्ह) संपन्न झाला.

या रोजगार मेळाव्यामध्ये ०८ नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यांचेमार्फत एकूण १७५ रिक्तपदांकरीता उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सदर मेळाव्यात एकूण २४० उमेदवारांनी नोंदणी केली. त्यामध्ये पुरूष १०३ व महिला १३७ आहेत. १४९ उमेदवारांनी प्रत्यक्ष आणि ९१ उमेदवारांनी गुगलफॉर्मद्वारे नोंदणी केली. सदर रोजगार मेळाव्यात १४९ उमेदवार प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित होते. त्यापैकी १३ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश अणे, प्रमुख पाहुणे म्हणून पवनी शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. विजया ठाकरे, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुधाकर झलके, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्र, भंडारा, तसेच डॉ. भूषण महाजन, प्लेसमेंट अधिकारी, नागपूर विद्यापीठ, नागपूर , विजय पांडव कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी, आ. दे वालदे कनिष्ठ कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी, अविनाश खेडीकर DSDA, डॉ.गणेश केदार, या कार्यक्रमाचे संयोजक डॉ. संजय घूगल, डॉ. अतुल कुमार सहारे, आयक्यूएसी समन्वयक व इतर उपस्थित प्राध्यापक वर्ग यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी डॉ. विजया ठाकरे, नगराध्यक्षा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले, तसेच मुलाखतीमध्ये आपण कसे यशस्वी व्हावे व नाही झाल्यास कुठे कमी पडत आहे त्यावर विचार करून सुधारणा करण्यास सांगितले.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये अविनाश खेडीकर DSDA यांनी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना, शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सुरु असलेले अल्पमुदतीचे अभ्यासक्रम, तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अशा सर्व कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये सहभाग नोंदवून जास्तीतजास्त उमेदवारांनी सदरील योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

सदर रोजगार मेळाव्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये अल्पमुदतीचे अभ्यासक्रम अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या एकूण ७३ उमेदवारांनी नोंदणी केली, तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींपैकी २४ प्रशिक्षणार्थीं नी सदर रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदविला.

प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुधाकर झलके सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्र, भंडारा, उपस्थित होते. तसेच डॉ. भूषण महाजन, प्लेसमेंट अधिकारी, नागपूर विद्यापीठ, नागपूर यांनी विद्यार्थ्यांना रोजगार संधींबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश अणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांच्या मुलाखतीमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले व आपण महाविद्यालयामध्ये आत्मसात केलेले कौशल्य मुलाखतीमध्ये दाखवून नोकरी मिळवण्याचे प्रयत्न करावे असे सांगितले व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

सदर रोजगार मेळावाच्या उदघाटनीय कार्यक्रमाचे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय घूगल यांनी केले. व आभार प्रदर्शन अमित मलोडे लिपिक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा यांनी व्यक्त केले. सदर रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा कार्यालयातील डॉ.सुधाकर झळके, सहायक आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली कार्यालयांतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी तसेच सायन्स कॉलेज पवनी येथील सर्व प्राध्यापक व अधिकारी कर्मचारी आदींनी परीश्रम घेतले.





  Print






News - Bhandara




Related Photos