महत्वाच्या बातम्या

 नैसर्गिक शेती ही केवळ गरज नसून शाश्वत भविष्याचा पाया : कुलगुरू डॉ. शरद गडाख


- राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान विभागीय कार्यशाळा उत्साहात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : रासायनिक शेतीचे मानवी आरोग्यावर आणि जमिनीच्या सुपीकतेवर होणारे घातक परिणाम पाहता, आता नैसर्गिक शेतीचा अवलंब करणे ही काळाची गरज बनली आहे. जमिनीचा पोत टिकवण्यासाठी आणि आरोग्यदायी उत्पादनासाठी नैसर्गिक तंत्रज्ञान हाच एकमेव शाश्वत पर्याय आहे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय, नागपूर यांच्या वतीने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान २०२६-२७ अंतर्गत विभागीय कार्यशाळेचे आयोजन आज रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन: तंत्रज्ञान आणि अनुभवांचा मेळ -
कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. धनराज उंदिरवाडे (विस्तार शिक्षण संचालक, डॉ. पंदेकृवि) यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या नैसर्गिक शेतीविषयक शिफारसींची माहिती दिली. यावेळी नैसर्गिक शेती क्षेत्रातील दिग्गज पद्मश्री सुभाष शर्मा यांनी विशेष मार्गदर्शक म्हणून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवातून नैसर्गिक शेतीचे अर्थशास्त्र आणि प्रत्यक्ष शेतावरील यशस्वी प्रयोगांची उदाहरणे दिली. कृषी विद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे यांनी नैसर्गिक पद्धतीने विविध पिकांचे उत्पादन, नैसर्गिक शेती संकल्पना बाबत माहिती दिली.

वरिष्ठ शास्त्रज्ञ, डॉ.प्रीतम चिरडे, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली यांनी  नैसर्गिक शेतीमध्ये निविष्ठा निर्मिती व वापर (जीवामृत, बीजमृत, निंबोळी अर्क, निमास्त्र इ.) बाबत माहिती दिली, कीटकशास्त्रज्ञ डॉ.राहुल वडस्कर यांनी कृषी महाविद्यालय नागपूर यांनी नैसर्गिक पद्धतीने किडरोग नियंत्रण याबाबत माहिती दिली. नैसर्गिक शेतीमध्ये काम करणारे प्रगतिशील शेतकरी यांनी आपले नैसर्गिक शेतीबाबत अनुभव कथन केले.

विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी प्रास्ताविकातून राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाची नागपूर विभागातील व्याप्ती आणि अंमलबजावणीची माहिती दिली.या सोहळ्यात नैसर्गिक शेतीमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विभागातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा आणि महाविस्तार नोंदणीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सभागृह परिसरात आयोजित नैसर्गिक उत्पादनांच्या प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या कार्यशाळेला विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, सर्व जिल्ह्यांचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आत्माच्या प्रकल्प संचालक,नागपूर डॉ. अर्चना कडू, कृषी अधिकारी व कर्मचारी,कृषी शास्त्रज्ञ व प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी योगेश राऊत यांनी केले, तर आभारप्रदर्शन  डॅा.कडू यांनी केले.





  Print






News - Nagpur




Related Photos