महत्वाच्या बातम्या

 घोट तालुका निर्मितीसाठी संघर्ष तीव्र : डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची तयारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / घोट : घोट येथे साईबाबा मंदिरात घोट तालुका संघर्ष समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला माजी आमदार व भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बैठकीत घोट तालुका निर्मितीचा प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आणि समितीने एकमताने डॉ. होळी यांना या लढ्याचे नेतृत्व करण्याचा प्रस्ताव दिला.

डॉ. होळी यांनी नेतृत्व स्वीकारण्याची तयारी दर्शवली, परंतु त्यांनी स्पष्ट केले की हा संघर्ष यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिक, युवक, सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची एकजूट आवश्यक आहे. घोट तालुका निर्मिती हा केवळ प्रशासकीय विषय नाही, तर स्थानिक विकास, प्रभावी प्रतिनिधित्व आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी निगडित प्रश्न आहे, असे त्यांनी सांगितले.

सध्या नागरिकांना शासकीय कामांसाठी लांब अंतर पार करावे लागते, ज्यामुळे वेळ आणि आर्थिक खर्च वाढतो. नवीन तालुका निर्माण झाल्यास प्रशासन अधिक जवळ येईल, सेवा जलद व सुलभ पद्धतीने उपलब्ध होतील. यासोबतच शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासाला गती मिळेल. विशेषतः आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या हक्काचे प्रशासन मिळून त्यांचे सशक्तीकरण होईल. तसेच शासकीय कार्यालयांच्या स्थापनेमुळे स्थानिक स्तरावर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.

बैठकीत घोट तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, सचिव आसिफ सय्यद, कोषाध्यक्ष अविनाश वडेट्टीवार, सरपंच रुपाली दूधबावरे, तमूस अध्यक्ष दिनकर लाकडे, माजी उपसरपंच विलास उईके, रूपा शहा, भाजपा बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, नानू उपाध्याय, प्रशांत शहा, पवन दुधाबावरे, हेमंत उपाध्याय, बंडू जुवारे, बंडू भांडेकर यांसह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

सर्व उपस्थितांनी एकजूट दाखवत घोट तालुका निर्मितीसाठी संघर्ष उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वाखाली हा मुद्दा शासन दरबारी अधिक प्रभावीपणे मांडला जाणार असून येत्या काळात घोट तालुका निर्मितीसाठी संघर्ष आणखी तीव्र होईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos