महत्वाच्या बातम्या

 मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठ : कमावती पत्नी आणि मुलासाठी पोटगी कायम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका दाम्पत्य प्रकरणात पत्नी आणि अल्पवयीन मुलासाठी पोटगी कायम ठेवण्याचा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी म्हटले आहे की, धडधाकट व्यक्ती कुटुंबाला पोसण्याची क्षमता नसल्याचा दावा करू शकत नाही.

प्रकरणातील पती नागपूरचा रहिवासी असून, दाम्पत्याचे लग्न १९ नोव्हेंबर २०१९ रोजी झाले होते. कौटुंबिक वादामुळे पत्नीला माहेरी जावे लागले, तर पतीने पोटगीची जबाबदारी टाळण्यासाठी न्यायालयाला स्वतःच्या उत्पन्नाची माहिती दिली नाही.

कमावती पत्नी, तरीही पोटगी कायम -
पत्नी सुशिक्षित असून, अभियांत्रिकी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. पतीने दावा केला की, पत्नी स्वतः व मुलाचा सांभाळ करण्यास सक्षम आहे, त्यामुळे पोटगी देण्याची आवश्यकता नाही. परंतु न्यायालयाने हा मुद्दा गुणवत्ताहीन ठरवत, कमावती असली तरी पोटगी नाकारता येणार नाही, असे स्पष्ट केले.

पत्नीला वेगळी राहण्याचा अधिकार -
न्यायालयाने असेही स्पष्ट केले की, जर सासरी छळ होत असेल, चांगली वागणूक मिळत नसेल किंवा सन्मानाने जगण्याची आशा संपली असेल, तर पत्नीला पतीसोबत राहण्यास नकार देण्याचा अधिकार आहे. या निर्णयामुळे कमावती पत्नी आणि तिच्या अल्पवयीन मुलाच्या हक्कांचे संरक्षण करण्यात आले असून, नागपूर खंडपीठाने महिलांच्या पोटगी अधिकारांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos