महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय लोक अदालतीत २०४९ प्रकरणांचा आपसी तडजोडीने निपटारा


- ४ कोटी ६३ लक्ष ५५  हजार रुपये तडजोड मूल्य


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशान्वये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष हेमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये २ हजार ४९ प्रकरणे आपसी तडजोडीने सोडविण्यात आली असून त्याचे तडजोड मूल्य ४ कोटी ६३ लक्ष ५५ हजार ६१६ इतके आहे.

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये दोन्ही पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळते तसेच दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणांमध्ये तडजोड होत असल्याने निकालाचे समाधान दोन्ही पक्षकारांना असते. यामुळे पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होऊन मनासारखा समझोता झाल्याने मानसिक समाधान लोक अदालतमुळे पक्षकारांना मिळते, असे विचार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष हेमंत गायकवाड  व जिल्हा न्यायाधिश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ए.एस.एम. अली यांनी राष्ट्रीय लोक अदालतप्रसंगी व्यक्त केले.

अदालतमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ए.एस.एम. अली, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख, अधिवक्ता मंडळी तसेच पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली निघणाऱ्या प्रकरणांमुळे पक्षकारांना समाधान लाभते. कारण दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणामध्ये समझोता होत असतो.

त्यामुळे वादापेक्षा समझोता बरा या विचारानुसार पक्षकारांनी आपसातील वाद सामोपचाराने लोक अदालतीमध्ये मिटवावे असे, विवेक देशमुख यांनी राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनामागील भूमिका विषद करतांना सांगितले.

जिल्ह्यातील न्यायालयामध्ये सपन्न झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणापैकी १ हजार ७५७ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. तडजोड झालेल्या प्रकरणांमधील तडजोडीची रक्कम २ कोटी ८६ लाख ३ हजार ४४७ रुपये इतके होते. तसेच वाद दाखल पुर्व प्रकरणांपैकी २९२ इतकी प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रककरणामधील तडजोडीचे मुल्य १ कोटी ७७ लाख ५२ हजार १६९ इतके आहे.

न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व वाद दाखल प्रकरणे मिळून एकुण २ हजार ४९ इतकी प्रकरणे लोक अदालतीमध्ये निकाली निघाली असून प्रकरणातील एकूण तडजोडीचे मुल्य ४ कोटी ६३ लाख ५५ हजार ६१६ इतके आहे.

तसेच लोक अदालतीमध्ये विशेष बाब म्हणजे जिल्ह्यातील न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली कौटूंबिक हिंसाचाराच्या ३ प्रकरणामध्ये  पती पत्नीमध्ये असलेले वाद निपटारा करण्यात यश प्राप्त झाले. व त्यांनी हसत खेळत आपले संसार करण्याचे ठरविलेले आहे, असे विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने कळविण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos