सावली पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून पकडला गोवंश तस्करीचा ट्रक : २२.९० लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : गोवंश तस्करीविरोधात सावली पोलिसांनी धाडसी कारवाई करत फिल्मी स्टाईल पाठलाग करून तस्करी करणारा ट्रक पकडला. या कारवाईत ३९ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून सुमारे २२ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून त्याचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ मार्च रोजी पहाटे सुमारे ४.४५ वाजताच्या सुमारास सावली पोलीस पथक नियमित रात्रीची गस्त घालत होते. त्यावेळी व्याहाडकडून सावलीकडे येणारा टाटा कंपनीचा आयशर ट्रक क्र. टीएस ०९ यूबी ८३८७ संशयास्पद अवस्थेत दिसून आला. पोलिसांनी ट्रक थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबवता सावली पोलीस ठाण्यासमोरील बॅरिकेड्सला धडक देत मूल रोडमार्गे सिंदेवाहीकडे वेगाने पळ काढला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सावली पोलिसांनी तत्काळ सिंदेवाही पोलिसांना नाकाबंदीबाबत सूचना दिल्या आणि ट्रकचा पाठलाग सुरू केला. सिंदेवाही येथेही आरोपीने पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सातत्याने सुरू असलेल्या पाठलागामुळे व ट्रकचे हेडलाईट फुटल्याने अखेर सिंदेवाही शहराबाहेर आरोपीला ट्रक थांबवावा लागला.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ट्रक चालक शाबीर दाऊत अली (वय ४२), रा. यशोधरा नगर रोड, नागपूर याला अटक केली. त्याचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
तपासात ट्रकमध्ये ३९ गोवंशीय जनावरे अत्यंत क्रूरपणे कोंबून कत्तल करण्याच्या उद्देशाने नेली जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी सर्व जनावरांची सुटका करून त्यांना चंद्रपूर येथील प्यार फाउंडेशन गोशाळेत सुरक्षितरित्या पाठविले.
या कारवाईत अंदाजे ३ लाख ९० हजार रुपये किंमतीची ३९ गोवंशीय जनावरे आणि सुमारे १९ लाख रुपये किंमतीचा टाटा आयशर ट्रक असा एकूण २२ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सावली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८१, महाराष्ट्र पशु संवर्धन कायदा कलम ५(अ)९, ११, प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम कलम ११ (घ), (ड), (ज), (झ), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ कलम ३ तसेच मोटार वाहन अधिनियम कलम २३९, १७७, ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व एसडीपीओ यांच्या मार्गदर्शनाखाली सावलीचे पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लुरवार, पोलीस उपनिरीक्षक सचिन मुसळे व त्यांच्या पथकाने पार पाडली.
फरार आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सावली पोलीस करत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




