भंडाऱ्यात नाल्यात बुडून ७४ वर्षीय इसमाचा मृत्यु : हरविल्याची तक्रार आधीच दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : शहरातील राजगुरू वॉर्डातील रहिवासी ७४ वर्षीय इसमाचा हनुमान नगर परिसरातील नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (२७) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अमृत सावत्री पारधी ( ७४) असे मृतकाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमृत पारधी हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. १९ जानेवारी रोजी दुपारी सुमारे १ वाजता त्यांनी घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडले होते. ते परत न आल्याने त्यांच्या पत्नी इंदूबाई पारधी यांनी २१ जानेवारी रोजी भंडारा शहर पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, २७ जानेवारी रोजी हनुमान नगर, भंडारा येथील नाल्यात एका इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेहाची ओळख अमृत सावत्री पारधी अशी पटविली.
मृतक यापूर्वीदेखील घरातून निघून गेले होते व वरठी येथे सापडले होते, अशी माहिती मृतकाचा मुलगा भुपेन अमृत पारधी यांनी भंडारा शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मर्गची नोंद केली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पुंडगे करीत आहेत.
News - Bhandara




Petrol Price




