गोंदिया जिल्ह्यात HSRP नंबर प्लेटसाठी परिवहन विभागाची कडक भूमिका

- सुमारे ७० हजार वाहनधारक अजूनही नियमबाह्य; विशेष तपासणी मोहिमेचा इशारा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने कडक भूमिका स्वीकारली आहे. जिल्ह्यातील एकूण १ लाख ८२ हजार वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक असताना, आतापर्यंत केवळ १ लाख १० हजार वाहनांवरच ही प्लेट बसवण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे ७० हजारांहून अधिक वाहनधारकांनी अजूनही नियमांचे पालन केलेले नाही, अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.
परिवहन विभागाच्या माहितीनुसार, एचएसआरपी नंबर प्लेट न बसवलेल्या वाहनांमध्ये ग्रामीण भागातील वाहनधारकांचे प्रमाण अधिक आहे. शासनाकडून एचएसआरपी बसवण्यासाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नसल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
सध्या राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे आतापर्यंत प्रत्यक्ष तपासणी व दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नव्हती. मात्र, आचारसंहिता शिथिल होताच गोंदिया जिल्ह्यात विशेष वाहन तपासणी मोहीम राबवली जाणार असून, एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा परिवहन विभागाने दिला आहे.
दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात रडाळ वाहन अर्थात नवीन तपासणी व विशेष वाहन तपासणी पथक कार्यरत करण्यात आले आहे. या पथकाने पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर वाहनांची तपासणी करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची नोंद घेतली. या मोहिमेदरम्यान नागरिकांना रस्ता सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
परिवहन विभागाकडून दुचाकी वाहनचालकांना हेल्मेटचा वापर, चारचाकी वाहनचालकांना सीट बेल्ट लावणे, तसेच वेगमर्यादेचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच इतर नागरिकांच्या जीवित सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
एचएसआरपी नंबर प्लेट न बसवलेल्या वाहनधारकांनी तात्काळ नियमांचे पालन करावे, अन्यथा कडक कारवाई व दंडाला सामोरे जावे लागेल, असे परिवहन विभागाने ठामपणे सांगितले आहे.
News - Gondia




Petrol Price




