अफगाणिस्तान हादरलं : ६.३ तीव्रतेच्या भूकंपात सात ठार, १५० हून अधिक जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / काबूल : अफगाणिस्तानमध्ये रविवारी रात्री आलेल्या तीव्र भूकंपाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ६.३ रिश्टर स्केलच्या या भूकंपात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून १५० हून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. बल्ख प्रांतातील मजार-ए-शरीफ शहरालाही मोठे नुकसान झाले आहे.
बल्ख प्रांताचे प्रवक्ते हाजी झैद यांनी रॉयटर्सला सांगितले की, भूकंपामुळे मजार-ए-शरीफच्या अनेक भागांमध्ये घरांचे व इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. तर आरोग्य विभागाचे प्रवक्ते समीम जोयांडा यांनी सांगितले की, सात जणांचा मृत्यू झाला असून १५० हून अधिक जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असून, अधिकृत आकडे सोमवारी सकाळपर्यंत मिळालेल्या अहवालांवर आधारित आहेत.
दरम्यान, यूएसजीएस (United States Geological Survey) ने आपल्या पेजर सिस्टम वर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या प्रणालीद्वारे भूकंपाच्या तीव्रतेनुसार संभाव्य हानीचा अंदाज वर्तवला जातो. प्राथमिक अहवालांनुसार, या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
भारतीय नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी (NCS) नुसार, पहिला भूकंप रविवारी रात्री ८.४० वाजता ३.९ रिश्टर स्केल तीव्रतेने झाला होता. त्यानंतर काही तासांतच हिंदूकुश प्रदेशात पुन्हा ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं.
स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन पथके तातडीने बचावकार्य राबवत असून, जखमींवर उपचार सुरू आहेत. अनेक कुटुंबे घराबाहेर रात्री घालवत असून, मदत आणि पुनर्वसनासाठी सरकारी यंत्रणा कार्यरत आहे.
News - World




Petrol Price




