जादूटोण्याच्या संशयावरून शेतकऱ्याचा निर्घृण खून : आरोपी काही तासांत अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील हेटीटोला गावात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आसाराम देऊ कांबळे (५५) या शेतकऱ्याचा जादूटोण्याच्या संशयावरून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना १७ जून रोजी दुपारी ३ ते संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान घडली.
माहितीनुसार, आसाराम कांबळे हे आपल्या शेळ्या चारण्यासाठी गावालगत असलेल्या जंगलात गेले होते. मात्र, संध्याकाळी शेळ्या घरी परत आल्या पण कांबळे परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी शोध घेतला असता जंगलातील तलावाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला लोखंडी कुऱ्हाडीचे गंभीर वार झाले होते.
हैदराबादवरून आला आणि केला खून -
पोलिस तपासात धक्कादायक बाब उघड झाली. आरोपी देवेंद्र उर्फ भुरू चुन्नीलाल ताराम (२४, रा. हेटी, सध्या राहणार हैदराबाद) हा कांबळे यांनी जादूटोना केल्याच्या संशयावरून रागात होता. त्याने खास खून करण्यासाठी हैदराबादहून गावी येत जंगलात कांबळे यांच्यावर पाठलाग करत डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला आणि त्यांचा जीव घेतला. गुन्हा घडल्यानंतर तो पुन्हा हैदराबादकडे पळून जात असताना पोलिसांनी त्याला हलबीटोला येथे पकडले.
तीन पोलिस पथकांच्या सशक्त तपासात आरोपी जेरबंद -
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपी देवेंद्रचा शोध घेतला. त्याच्या नातेवाइकांच्या घराजवळ सापळा रचून त्याला पकडण्यात आले. आधी आरोपीने उडवाउडवीची उत्तरे देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसी खाक्या दाखविताच त्याने खून केल्याची कबुली दिली.
IPC कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल -
या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी -
ही महत्त्वपूर्ण कारवाई सहायक पोलिस निरीक्षक धीरज राजुरकर, उपनिरीक्षक शरद सैंदाणे, पोलिस हवालदार राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, विठ्ठल ठाकरे, दीक्षितकुमार दमाहे, प्रकाश गायधने, इंद्रजित बिसेन, सुबोध बिसेन, हंसराज भांडारकर, छगन विठ्ठले, राकेश इंदुरकर, सुनील डहाके, योगेश रहिले, लक्ष्मण बंजार, घनश्याम कुंभलवार, राम खंडारे यांच्या संयुक्त प्रयत्नातून शक्य झाली.
गावात भीतीचे वातावरण -
या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले असून जादूटोण्याच्या संशयावरून आजही ग्रामीण भागात अशा प्रकारे जीव घेतले जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पोलिस अधिक तपास करत असून आरोपीवर कठोर कारवाई होण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
News - Gondia




Petrol Price




