समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात तुमसरच्या ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू


- ट्रकला ओव्हरटेक करताना वाहनावरील नियंत्रण सुटले; खासगी बँकेत अधिकारी म्हणून होता कार्यरत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तुमसर येथील ३५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २४ नोव्हेंबरच्या रात्री घडली. गौरव पांडे (रा. विनोबा नगर, तुमसर) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे तुमसर शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव पांडे हे एमएच ०९ सीजे ७३१५ क्रमांकाच्या वाहनाने नागपूरहून मुंबईच्या दिशेने प्रवास करीत होते. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक २९६.०१ येथे रात्रीच्या सुमारास त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. पुढे जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत गौरव पांडे यांचा गंभीर अपघाती मृत्यू झाला.
गौरव पांडे हे मुंबई येथील एका खासगी बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याने पांडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गौरव यांच्या अपघाती मृत्यूची बातमी तुमसर शहरात पोहोचताच मित्रपरिवार, नातेवाईक आणि परिचितांमधून तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. हसतमुख आणि तरुण वयातील गौरव यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




Petrol Price




