ज्यांच्या झोपड्या तोडल्या गेल्या, त्यांना मिळणार घरकूल : आमदार विनोद अग्रवाल


रेल्वे प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी विकासकामांसाठी ३२ झोपड्या तोडल्या होत्या
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया शहरातील डॉ. आंबेडकर वॉर्डामध्ये रेल्वे लाईनलगत नगर परिषदेच्या जागेवर गेल्या ३० वर्षांपासून झोपड्या बांधून राहत असलेल्या गरीब कुटुंबांच्या ३२ झोपड्या रेल्वे प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी विकासकामांसाठी तोडल्या होत्या.
त्यामुळे ही कुटुंबं बेघर झाली होती. ही कुटुंबं आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्यामुळे माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते घनश्याम पानतवने यांनी १६ कुटुंबांसाठी स्वतःच्या खर्चाने प्लॉट खरेदी करून दिले, तर उर्वरित १६ कुटुंबांना अत्यंत कमी दरात प्लॉट उपलब्ध करून देण्यात आले.
या प्लॉटवर घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी या बेघर कुटुंबांनी एक वर्षापूर्वी अर्ज दाखल केले होते. मात्र काही कारणास्तव सर्व अर्ज रद्द करण्यात आले होते.
या बाबतची माहिती गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडे पोहोचताच त्यांनी तात्काळ २ मे रोजी कारवाई करत समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे, अपर तहसीलदार श्रीकांत कांबळे यांना संबंधित जागी - डॉ. आंबेडकर वॉर्ड येथे - बुलावून घेतले. त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन बेघर कुटुंबांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि सर्व ३२ कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ लवकरच मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देशही दिले. या भेटीत घनश्याम पानतवने, बंटी पंचबुद्धे, व सामाजिक कार्यकर्ते अमित भालेराव देखील उपस्थित होते.
News - Gondia




Petrol Price




