महत्वाच्या बातम्या

 निसर्गाच्या कुशीत नागरिकांचा ओढा : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला ३६ हजारांहून अधिक पर्यटकांची भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : सिमेंट काँक्रीटच्या जगात दमछाक झाल्यानंतर नागरिक आता निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी वनपर्यटनाकडे वळू लागले आहेत. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला वर्ष २०२४- २५ (मार्च २०२४ ते एप्रिल २०२५) दरम्यान तब्बल ३६ हजार ५९२ पर्यटकांनी भेट दिली असून, त्यांनी जंगल सफारीचा मनमुराद आनंद घेतला आहे.

वाघोबांच्या सहवासात जंगल सफारीचा अनुभव -
नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघांचा अधिवास असल्याने येथे वाघोबांचे दर्शन होण्याची हमी असते. हीच पर्यटकांना आकर्षित करणारी मोठी बाब ठरत आहे. प्रकल्प पावसाळ्यात बंद राहतो, तरीही उर्वरित काळात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. विशेषतः जून महिन्यात सर्वाधिक ८ हजार ३३४ पर्यटकांनी जंगल सफारी केली, हे उल्लेखनीय आहे.

ऑनलाइन- ऑफलाइन बुकिंगद्वारे पर्यटकांची उपस्थिती -
पर्यटकांनी सफारीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून बुकिंग केल्याचे आढळते. यामध्ये ऑफलाइन बुकिंग करणाऱ्यांची संख्या अधिक असून, वर्षभरात एकूण १९ हजार ५११ पर्यटकांनी ऑफलाइन, तर १७ हजार ८१ पर्यटकांनी ऑनलाइन बुकिंग करून व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली.

फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंगची क्रेझ -
जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना वन्यजीवांचे फोटो व व्हिडिओ काढण्याची विशेष आवड आहे. काही जण साध्या कॅमेराचा वापर करतात, तर काही जण व्यावसायिक सिने कॅमेराचा उपयोग करतात. यामुळे वनविभागाने त्यावर शुल्क आकारणी केली असून, साधा कॅमेरा वापरणाऱ्यांकडून ४.८१ लाख रुपये व सिने कॅमेरा वापरणाऱ्यांकडून ३० हजार ८४९ रुपये महसूल मिळवण्यात आला आहे.

९४ लाखांहून अधिक महसूल -
जंगल सफारीसाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश शुल्कातून वनविभागाला वर्षभरात एकूण ९४ लाख ६० हजार ९० रुपये महसूल मिळाला आहे. हे वनपर्यटन क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आर्थिक उत्पन्न ठरले आहे.

निसर्गकडे वळणारी शहरे -
शहरांमध्ये वाढत्या प्रदूषणामुळे आणि जागेच्या अभावामुळे मोकळा श्वास घेणे कठीण झाले आहे. त्यामुळेच नागरिक निसर्गाकडे वळत असून, वनपर्यटनाचा कल वाढत चालला आहे. नवेगाव- नागझिरा प्रकल्प हे त्याचे ठळक उदाहरण ठरू शकते.





  Print






News - Gondia




Related Photos