महत्वाच्या बातम्या

 बी. प्रभाकरन यांना ग्लोबल पीस ऑनर्स २०२६ पुरस्कार; सन्मान गडचिरोलीच्या जनतेला समर्पित


- औद्योगिक विकास, रोजगारनिर्मिती आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल; गडचिरोलीत २५ हजार कोटींच्या एकात्मिक पोलाद प्रकल्पाची योजना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक, सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांना प्रतिष्ठेच्या ग्लोबल पीस ऑनर्स २०२६ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, स्थानिक युवकांचे कौशल्यविकास, आरोग्य, शिक्षण आणि सामुदायिक विकास या क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, बी. प्रभाकरन यांनी हा पुरस्कार स्वतःपुरता मर्यादित न ठेवता गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला समर्पित केला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी दाखविलेला विश्वास, सहकार्य आणि विकासाच्या प्रवासातील सहभाग हीच आपली सर्वांत मोठी प्रेरणा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे दिव्याज फाउंडेशनच्या वतीने या भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अभिनेते शाहरुख खान, रणवीर सिंह आणि अक्षय कुमार तसेच मनोरंजन, क्रीडा आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रतिष्ठित सोहळ्यात बी. प्रभाकरन यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या मनोगतात बी. प्रभाकरन यांनी गडचिरोलीच्या विकासाबाबतची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, गडचिरोलीमध्ये औद्योगिक उपस्थिती निर्माण करताना शाश्वत विकास, स्थानिक नागरिकांच्या आकांक्षा आणि पर्यावरणीय संवेदनशीलता यांचा समतोल राखणे हे कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. औद्योगिकीकरणाचा फायदा केवळ कारखान्यांच्या विस्तारापुरता मर्यादित न राहता त्याचा थेट लाभ स्थानिक युवक, महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांपर्यंत पोहोचला पाहिजे.

स्थानिक युवकांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, कुटुंबांना दर्जेदार आरोग्यसेवा व शिक्षण मिळवून देणे तसेच उपजीविकेची साधने विकसित करणे या बाबींना कंपनी प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक जनतेच्या सहभागाशिवाय आणि विश्वासाशिवाय विकासाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे गडचिरोलीच्या जनतेने कंपनीवर दाखविलेला विश्वास हीच आपली सर्वांत मोठी ताकद असून हा पुरस्कार त्यांचाच असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी आपल्या आई-वडिलांसह बंधू कार्तिकेयन यांच्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच बबलूलाल अग्रवाल, मुकेश गुप्ता आणि राजेश गुप्ता यांनी आपला प्रस्ताव स्वीकारून लॉयड्स परिवारात काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. कंपनीच्या व्यावसायिक प्रगतीसोबतच गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्याची बांधिलकी कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

१७ हजार ५०० हून अधिक रोजगारांची निर्मिती -
बी. प्रभाकरन यांच्या नेतृत्वाखाली लॉयड्स मेटल्सने रोजगारनिर्मितीच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत १७ हजार ५०० हून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये सुमारे १४ हजार ५०० पुरुष आणि ३ हजार महिलांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक विकासाला आणखी गती देण्यासाठी कंपनीने २५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून एकात्मिक पोलाद प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राचा विस्तार होण्यासोबतच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने ही गुंतवणूक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

कौशल्य विकासातून युवकांना रोजगाराच्या संधी -
स्थानिक युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी कंपनीकडून कौशल्य विकासावर विशेष भर दिला जात आहे. बोडली येथे लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल अँड एंटरप्रेन्योरशिप (LMGSE) अकादमीच्या माध्यमातून विविध व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जात आहेत. या अकादमीमध्ये औद्योगिक कौशल्य, वाहनचालक प्रशिक्षण, लॉजिस्टिक्स, हॉस्पिटॅलिटी, डिजिटल कौशल्य आणि खाण सुरक्षा यांसारख्या विविध क्षेत्रांत प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत एक हजाराहून अधिक प्रशिक्षणार्थींनी येथे प्रशिक्षण पूर्ण केले असून, कंपनीने दिलेल्या माहितीनुसार प्रशिक्षणार्थींच्या प्लेसमेंटचा दर १०० टक्के आहे. यामध्ये ४०० हून अधिक महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. तसेच ३० हून अधिक विविध ट्रेडमध्ये प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील युवकांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळत आहे.

आरोग्यसेवेतून २.७६ लाखांहून अधिक नागरिकांना लाभ -
लॉयड्स इनफिनिट फाउंडेशनच्या माध्यमातून कंपनी आरोग्य, शिक्षण आणि उपजीविका विकासाशी संबंधित विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांमुळे आतापर्यंत २ लाख ७६ हजारांहून अधिक नागरिकांना लाभ मिळाल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. याअंतर्गत २५ हून अधिक फिरते आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली असून, ४९७ हून अधिक संस्थात्मक प्रसूतींसाठी सहकार्य करण्यात आले आहे. लॉयड्स काली अम्माल मेमोरियल रुग्णालयाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना मोफत बाह्यरुग्ण विभागातील वैद्यकीय सल्ला, शस्त्रक्रिया आणि माता-बाल आरोग्य सेवांसह विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे उपक्रम महत्त्वाचे ठरत आहेत.

शिक्षण क्षेत्रात २,५०० विद्यार्थ्यांना संधी -
शिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी मिळावी, या उद्देशाने कंपनीने विविध शैक्षणिक उपक्रम हाती घेतले आहेत. लॉयड्स राज विद्या निकेतनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत निवासी सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. कंपनीच्या विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये एकूण २ हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यापैकी २ हजार १०० हून अधिक विद्यार्थी निवासी स्वरूपात शिक्षण घेत आहेत. एकूण विद्यार्थी संख्येत मुलींचे प्रमाण ४५.७ टक्के आहे. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यातील ३० हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी संपूर्ण शिष्यवृत्ती आणि आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपक्रमामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या संधी खुल्या होत आहेत.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ११० टक्क्यांची वाढ -
शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी कंपनीकडून शेतकऱ्यांनाही विविध माध्यमांतून सहकार्य केले जात आहे. आतापर्यंत ३५० हून अधिक शेतकऱ्यांना मदत करण्यात आली असून, या उपक्रमांमधील लाभार्थी कुटुंबांच्या घरगुती उत्पन्नात ११० टक्क्यांची वाढ झाल्याचे कंपनीने नमूद केले आहे. याशिवाय, आत्मसमर्पण केलेल्या ९६ हून अधिक नक्षलवादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रोजगाराच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात पुनर्समावेशन होण्याच्या प्रक्रियेला मदत करण्याचा प्रयत्न कंपनीकडून केला जात आहे.

महिलांच्या स्वावलंबनासाठी वान्या गारमेंट सेंटर -
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठीही कंपनीने पुढाकार घेतला आहे. ‘वान्या गारमेंट सेंटर’च्या माध्यमातून स्थानिक महिलांना शिवणकाम, वस्त्रनिर्मिती आणि संबंधित कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. यामुळे महिलांना रोजगाराच्या संधी मिळण्यासोबतच कुटुंबाच्या आर्थिक विकासात योगदान देता येत आहे.

औद्योगिकीकरणासोबत सामाजिक विकासावर भर -
गडचिरोली जिल्हा नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असला, तरी औद्योगिक आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीने जिल्ह्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत औद्योगिक गुंतवणुकीसोबत रोजगार, शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सक्षमीकरण आणि कौशल्य विकास यांसारख्या क्षेत्रांतही कंपनीकडून उपक्रम राबविले जात आहेत. लॉयड्स मेटल्सच्या माध्यमातून सुरू असलेल्या या विविध उपक्रमांचा उद्देश औद्योगिक विकासाचा लाभ स्थानिक समाजापर्यंत पोहोचविणे हा आहे. कारखान्यांची उभारणी आणि उत्पादनवाढ यांसोबतच स्थानिक नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यावर कंपनी भर देत असल्याचे या उपक्रमांतून दिसून येते. ग्लोबल पीस ऑनर्स २०२६ हा पुरस्कार स्वीकारताना बी. प्रभाकरन यांनी तो गडचिरोलीच्या जनतेला समर्पित करून विकासाच्या प्रक्रियेत स्थानिक नागरिकांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि सामाजिक विकास यांची सांगड घालत गडचिरोलीला विकासाच्या नव्या वाटेवर नेण्याच्या प्रयत्नांना या सन्मानामुळे राष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळाली आहे.





  Print






Related Photos