महत्वाच्या बातम्या

 बल्लारपुरात बंद घर फोडून १ लाख ७७ हजारांची चोरी : सोन्याचा गोफ आणि रोकड लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील महाराणा प्रताप वॉर्ड, आदर्श चौक परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून १ लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करणाऱ्या चोरट्यांनी बेडरूममधील दोन लोखंडी कपाटे फोडून दोन तोळे वजनाचा सोन्याचा गोफ आणि ५७ हजार रुपयांची रोकड लंपास केली.

अतिश तुळशीराम बेसांबरे (४५) हे आईसोबत महाराणा प्रताप वॉर्डात राहतात. २८ ऑक्टोबर रोजी ते मित्रासोबत गोव्याला गेले होते. त्यानंतर त्यांची आईही नागपूर येथे नातेवाइकांच्या लग्नासाठी गेली होती. त्यामुळे घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली.

१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अतिश यांचे मित्र शैलेश वानखेडे यांनी फोन करून घराचा आतील दरवाजा उघडा दिसत असल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी श्वानपथकासह घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.

३ नोव्हेंबर रोजी रात्री अतिश घरी परतले असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. बेडरूममधील दोन्ही लोखंडी कपाटांचे दरवाजेही उघडे होते. तपासणी केली असता कपाटात ठेवलेला अंदाजे १ लाख २० हजार रुपये किमतीचा दोन तोळ्यांचा सोन्याचा गोफ आणि ५७ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी अतिश येसांबरे यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध तपास सुरू आहे. 

दरम्यान, बाहेरगावी जाताना नागरिकांनी घराच्या सुरक्षिततेबाबत विशेष खबरदारी घ्यावी. घराला कुलूप लावून जाताना शेजारी व आजूबाजूच्या घरमालकांना याची माहिती द्यावी. परिसरातील संशयास्पद हालचालींकडे लक्ष ठेवण्याची विनंती करावी. घर अनेक दिवस बंद राहणार असल्यास शेजाऱ्यांच्या संपर्कात राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.





  Print






Related Photos