एसटी बसमध्ये प्रवाशाला हृदयविकाराचा झटका : वाहक-चालक आणि तरुणीच्या सतर्कतेने वाचला जीव


- प्रिया रामटेके यांनी दिले सीपीआर; लाखनी ग्रामीण रुग्णालयात तातडीच्या उपचाराने प्रकृती सुधारली
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : प्रवासादरम्यान अचानक हृदयविकाराचा झटका आलेल्या एका प्रवाशाचा जीव वाचविण्यासाठी एसटी बसचे वाहक, चालक आणि एका तरुणीने दाखवलेली तत्परता कौतुकास्पद ठरली आहे. लाखनी येथील समर्थ नगर प्रवासी निवाऱ्यासमोर घडलेल्या या घटनेत वेळीच मिळालेल्या मदतीमुळे प्रवाशाचे प्राण वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, साकोली आगाराची एसटी बस (क्रमांक एमएच १४ एलएक्स ८३७३) साकोलीहून नागपूरच्या दिशेने जात होती. बसमध्ये देवरी येथील रहिवासी लखन जुगनाके हे प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्रकृती गंभीर झाली.
यावेळी त्यांच्या शेजारी बसलेल्या प्रिया रामटेके यांनी प्रसंगावधान राखत तातडीने मदत सुरू केली.वैद्यकीय प्राथमिक उपचार पद्धतीनुसार त्यांनी जुगनाके यांना सीपीआर (Cardiopulmonary Resuscitation) देण्यास सुरुवात केली. त्यांच्या या तत्परतेमुळे जुगनाके यांना प्राथमिक मदत मिळाली.
दरम्यान, बसचे वाहक अनिल वलथरे आणि चालक राहुल ईलमकार यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. प्रवाशाचा जीव वाचविण्यासाठी त्यांनी बस थेट लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयाकडे वळवली.
रुग्णालयात पोहोचल्यानंतर सहप्रवाशांनीही मदतीचा हात पुढे केला. त्यांनी तातडीने स्ट्रेचरची व्यवस्था करून जुगनाके यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या पथकाने त्वरित उपचार सुरू केल्याने त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झाली असून, ते आता धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.अचानक आलेल्या संकटाच्या वेळी प्रिया रामटेके यांनी दाखवलेले धैर्य, तसेच एसटी चालक-वाहक आणि सहप्रवाशांनी दाखवलेली माणुसकी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाला जीवनदान मिळाले आहे.




Petrol Price




