महत्वाच्या बातम्या

 संजय गांधी व श्रावणबाळच्या लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्रासाठी ॲप सुविधा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : लाभार्थ्यांना हयातीचे प्रमाणपत्र मोबाईल ॲपद्वारे सादर करता यावे याकरीता बेनेफिसरी सत्यापण ॲप (BSA) ही ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी या ॲपचा वापर करुन डिजीटल हयात प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन देवळीचे तहसिलदार समर्थ क्षिरसागर यांनी केले आहे.

राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य योजनेतील वृध्द, विधवा, घटस्फोटीत महिला, परित्यक्या, अनाथ, अपंग, दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती इत्यादी लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र सादर करावे लागतात. पात्र लाभार्थ्यांना मोबाईल मार्फत अथवा गावपातळीवरील ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, ग्रामपंचायत मधील संगणक परिचालक व कर्मचारी यांच्या मार्फत अथवा सेतू सेवा केंद्र, आपले सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र इत्यादीमार्फत बेनेफिसियरी सत्यापण ॲपद्वारे ऑनलाईन पध्दतीने हयात प्रमाणपत्र सादर करता येणार आहे.

ही सेवा लाभार्थ्यांना वापरण्यास नि:शुल्क आहे. तथापि लाभार्थ्यांनी आपले सेवा केंद्रामार्फत घेतल्यास ५० रुपये शुल्क आकारण्यात येईल. यासाठी लाभार्थ्यांनी ॲप प्रणालीचा वापर करुन आपले हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने तयार करुन त्यासह श्रावणवाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी वृध्दपकाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांनी आपले अद्यावत आधारकार्ड, बँक खाते पासबुक ची छायांकीत प्रत तसेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांनी आपले अद्यावत आधारकार्ड, बँक खाते पासबुक ची छायांकीत प्रत व चालु वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र, अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र, अद्यावत यू.डॉ.आय.डी. कार्ड इत्यादी तहसिल कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना शाखेत सादर करावे, असे देवळीच्या तहसिलदारांनी कळविले आहे.





  Print






Related Photos