महत्वाच्या बातम्या

 फुलपाखरांच्या अनोख्या रंगीत विश्वात रमले विद्यार्थी


- चपराळा अभयारण्यात बिग बटरफ्लाय मंथनिमित्त फुलपाखरू सर्वेक्षण; जैवविविधता संवर्धनाचे विद्यार्थ्यांना धडे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : विविध रंग, आकार आणि वैशिष्ट्यांनी नटलेल्या फुलपाखरांच्या अनोख्या विश्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेत गडचिरोलीतील विद्यार्थी निसर्गाच्या सान्निध्यात रमून गेले. बिग बटरफ्लाय मंथनिमित्त उपविभागीय वन अधिकारी (वन्यजीव), आलापल्ली वनविभाग आणि ग्रीन्स संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. १९) चपराळा अभयारण्यात फुलपाखरू सर्वेक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी अभयारण्यातील विविध प्रजातींच्या फुलपाखरांचे निरीक्षण करत जैवविविधतेचा जवळून अभ्यास केला.

मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. प्रभूनाथ शुक्ल, आलापल्ली वनविभागाचे उपविभागीय वन अधिकारी (वन्यजीव) मंगेश बाळापुरे, गडचिरोलीचे मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे आणि ग्रीन्स संस्थेच्या अध्यक्ष अंजली कुळमेथे यांच्या नेतृत्वाखाली हा एकदिवसीय कार्यक्रम घेण्यात आला.

या उपक्रमासाठी ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक संजय शेगावकर तसेच चंद्रपूरचे मानद वन्यजीव रक्षक मुकेश भांदककर यांनी मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना फुलपाखरांच्या विविध प्रजाती, त्यांचे अधिवास, सवयी आणि पर्यावरणातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

विविध प्रजातींचे प्रत्यक्ष निरीक्षण -
या एकदिवसीय शिबिरात महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आणि श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी चपराळा अभयारण्य परिसरातील इल्लूर आणि सीतापूर तलाव परिसरात फिरून विविध प्रजातींच्या फुलपाखरांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले.

या सर्वेक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना Nymphalidae कुटुंबातील ब्लू टायगर, प्लेन टायगर, स्ट्राइप टायगर, कॉमन क्रो, कॉमन मॉरमॉन, लाइम बटरफ्लाय आणि ग्रेट एगफ्लाय यांसह विविध फुलपाखरे पाहायला मिळाली.

तसेच Pieridae गटातील कॉमन एमिग्रंट, कॉमन ग्रास यलो आणि कॉमन जेझेबेल, तर Papilionidae गटातील कॉमन रोज या फुलपाखरांचेही विद्यार्थ्यांनी निरीक्षण केले. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ‘ब्लू मॉर्मन’ पाहण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळाली.

फुलपाखरांचे पर्यावरणातील महत्त्व समजले -
फुलपाखरांचे केवळ सौंदर्य अनुभवण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न राहता त्यांच्या पर्यावरणीय भूमिकेची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विविध फुलपाखरांची ओळख, त्यांची वैशिष्ट्ये, अधिवास, जीवनचक्र तसेच जैवविविधता आणि निसर्ग संवर्धनातील त्यांचे महत्त्व याबाबत तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

आलापल्ली वनविभागाचे उपविभागीय वन अधिकारी (वन्यजीव) मंगेश बाळापुरे, गडचिरोलीचे मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, ग्रीन्स संस्थेच्या अध्यक्ष अंजली कुळमेथे, ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक संजय शेगावकर आणि चंद्रपूरचे मानद वन्यजीव रक्षक मुकेश भांदककर यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांची माहिती दिली.

फुलपाखरांचे अस्तित्व हे परिसरातील जैवविविधतेचे महत्त्वाचे निदर्शक असून, त्यांच्या संवर्धनासाठी नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना तज्ज्ञांकडून उत्तरे -
फुलपाखरू निरीक्षणानंतर विद्यार्थ्यांसोबत समूह चर्चा घेण्यात आली. या चर्चेत निसर्ग आणि जैवविविधतेचे महत्त्व, वन्यजीव संवर्धनाची गरज आणि पर्यावरण रक्षणातील विद्यार्थ्यांची भूमिका यावर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी फुलपाखरांच्या जीवनचक्रापासून त्यांच्या अधिवासापर्यंत विविध प्रश्न उपस्थित केले. तज्ज्ञांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत विद्यार्थ्यांचे कुतूहल आणि ज्ञान वाढविले.

यावेळी निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रातील तसेच वनविभागातील करिअरच्या विविध संधींबाबतही विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. त्यामुळे निसर्ग अभ्यास, वन्यजीव संशोधन आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना या मार्गदर्शनाचा लाभ झाला.

वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सहकार्य -
फुलपाखरू सर्वेक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चपराळ्याचे वनपरीक्षेत्र अधिकारी गणेश लांडगे, क्षेत्र सहायक चंद्रकांत सडमेक, क्षेत्र सहायक धनंजय कुमरे यांच्यासह वनविभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

फुलपाखरांच्या रंगीबेरंगी विश्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेत विद्यार्थ्यांनी निसर्गाशी नाते जोडण्यासोबतच जैवविविधता संवर्धनाची गरजही समजून घेतली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयीची जिज्ञासा वाढून पर्यावरण संवर्धनाची जाणीव अधिक दृढ होण्यास मदत होत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.





  Print






Related Photos