महत्वाच्या बातम्या

 विषारी औषध प्राशन केल्याने ५४ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू


- मोहनटोला येथील दुर्दैवी घटना; उपचारापूर्वीच रुग्णालयात मृत घोषित, देवरी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : देवरी तालुक्यातील मोहनटोला येथे विषारी औषध प्राशन केल्याने ५४ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी ८ दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. रमेश भुरेसिंग बैस ५४, रा. मोहनटोला, ता. देवरी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश बैस यांनी विषारी औषध प्राशन केल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. प्रकृती खालावत असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले.

रुग्णालयात पोहोचल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रमेश बैस यांची तपासणी केली. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे निदर्शनास आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे बैस कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, मृत रमेश बैस यांचा मुलगा निशांत रमेश बैस २३, रा. मोहनटोला यांनी देवरी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी प्रकरणाची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली आहे.

घटनेची नेमकी परिस्थिती, विषारी औषध प्राशन करण्यामागील कारण तसेच इतर बाबींचा पोलीस तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गोपीचंद इस्कापे करीत आहेत.





  Print






News - Gondia




Related Photos