जिवतीत अवैध सागवान वाहतुकीचा भंडाफोड : चार तस्करांना बेड्या


- ६ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त; तीन संशयित फरार, वनविभागाचे पथक मागावर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / जिवती : जिवती वनपरिक्षेत्रातील सोरेकसा-शेनगाव मार्गावर सुरू असलेल्या सागवान लाकडाच्या अवैध वाहतुकीचा वनविभागाने रविवारी भंडाफोड केला. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून वनपथकाने संशयित पिकअप वाहनावर कारवाई केली. या कारवाईत सागवान लाकूड आणि पिकअप वाहन असा एकूण ६ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून आणखी तीन संशयित फरार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
मध्यचांदा विभागाचे उपवनसंरक्षक योगेश वाघाये आणि राजुरा उपविभागीय वनाधिकारी मंगेश गिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिवतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून सापळा -
जिवती वनपरिक्षेत्रातील सोरेकसा ते शेनगाव मार्गावर सागवान लाकडाची अवैध वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली होती. माहिती मिळताच वनविभागाने विशेष पथक तयार करून संशयित वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.दरम्यान, रात्रीच्या गस्तीवेळी शेनगाव परिसरात संशयास्पद पिकअप वाहन आढळून आले. वनपथकाने वाहन थांबवून त्याची तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनातून सागवान लाकडाच्या अवैध वाहतुकीशी संबंधित बाबी निदर्शनास आल्या. त्यानंतर वनविभागाने वाहन ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला.
परिसरात सागवानाचा साठा -
वनविभागाच्या तपासादरम्यान परिसरात सागवान लाकूड साठवून ठेवण्यात आल्याचेही निदर्शनास आले. त्यानंतर पथकाने तत्काळ कारवाई करत सागवान लाकूड आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले पिकअप वाहन जप्त केले.वनविभागाच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या सागवान लाकडाची अंदाजे किंमत १ लाख २१ हजार रुपये, तर पिकअप वाहनाची किंमत सुमारे ५ लाख रुपये आहे. अशाप्रकारे जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ६ लाख २१ हजार रुपये आहे.
तीन संशयित फरार पथक मागावर -
या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून आणखी तीन संशयित फरार आहेत. फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी वनविभागाचे पथक सक्रिय झाले असून त्यांच्या मागावर पथक रवाना करण्यात आले आहे. अवैध सागवान वाहतुकीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, सागवान कुठून आणण्यात आले आणि त्याची पुढे कुठे वाहतूक केली जाणार होती, याचाही तपास वनविभागाकडून करण्यात येत आहे.या कारवाईमुळे जिवती परिसरातील अवैध सागवान तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. वनसंपत्तीची अवैध तोड आणि वाहतूक रोखण्यासाठी वनविभागाने गस्त व तपासणी अधिक कडक करण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.
वनकर्मचाऱ्यांचा सहभाग -
ही कारवाई यशस्वी करण्यासाठी क्षेत्रसहायक एस. एम. सलामे (शेनगाव), एस. व्ही. सावसागडे, एन. आर. चापले (पाटण), ए. एम. गेडाम (जिवती) यांच्यासह ए. डी. गोरकर, अविनाश राठोड, सय्यद, एम. ई. मोरे, पी. एच. कोवे, आर. सी. टेकाम तसेच वनरक्षक आणि इतर वनकर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.फरार संशयितांचा शोध आणि जप्त सागवानाच्या अवैध वाहतुकीमागील संपूर्ण साखळीचा उलगडा करण्यासाठी वनविभागाचा पुढील तपास सुरू आहे.
News - Chandrapur




Petrol Price




