स्मार्ट मीटरविरोधात काँग्रेस आक्रमक : प्रक्रिया न थांबवल्यास महावितरण कार्यालयाला ताळे ठोकण्याचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वडसा : शहरात महावितरणकडून घराघरात स्मार्ट वीज मीटर बसविण्याचे काम सुरू असताना या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्षाने तीव्र भूमिका घेतली आहे. सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या हिताचा विचार करून स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तातडीने थांबविण्यात यावी, अन्यथा महावितरण कार्यालयाला ताळे ठोकून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष इलियास खान यांनी दिला. यासंदर्भात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अभियंत्यांना निवेदन सादर करून नागरिकांच्या भावना व मागण्या मांडल्या.
देसाईगंज शहरात महावितरणने स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम हाती घेतली असून अनेक ठिकाणी मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र, या नव्या मीटरच्या कार्यपद्धतीबाबत ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात वाढ होण्याची शक्यता असल्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली असून त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणने स्मार्ट मीटरबाबत नागरिकांना सविस्तर माहिती देण्याची, त्यांच्या शंकांचे समाधान करण्याची आणि लोकांचा विश्वास संपादन होईपर्यंत मीटर बसविण्याची प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी केली. ग्राहकांच्या हिताकडे दुर्लक्ष करून ही मोहीम सुरूच ठेवण्यात आल्यास काँग्रेसच्या वतीने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
महावितरणच्या अभियंत्यांना निवेदन देताना देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू बुल्ले, नगर परिषद गटनेते विकास प्रधान, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज ढोरे, अनुसूचित जाती-जमाती विभागाचे तालुका अध्यक्ष आक्रोश शेंडे, फैझान पटेल, कैलास बगमारे, सीमा डोंगरे, डोमाजी दिवटे, शरीफ शेख, प्रमोद कारंडे, मुजीब शेख, खैरूनणीसा शेख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.काँग्रेसच्या या आक्रमक भूमिकेमुळे देसाईगंजमध्ये स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून, महावितरण या निवेदनाची कोणती दखल घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




