मैत्री दिनाच्या सहलीवर काळाचा घाला : अपघातातील तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

- भिसीजवळ अज्ञात कारची धडक; दोन तरुणींवर उपचार सुरू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : मैत्री दिनानिमित्त शंकरपूरजवळील मुक्ताई धबधबा पाहण्यासाठी निघालेल्या महाविद्यालयीन मित्र-मैत्रिणींच्या सहलीवर काळाने घाला घातला. रविवारी भिसीजवळ भरधाव अज्ञात कारने तीन तरुणींना धडक दिल्याच्या घटनेतील गंभीर जखमी रिया देवगिरीकर २० वर्षे रा. हिंगणघाट हिचा नागपूर येथे उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. या घटनेमुळे मित्रपरिवार आणि महाविद्यालयीन वर्तुळात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील एकाच महाविद्यालयात शिक्षण घेणारे काही मित्र-मैत्रिणी मैत्री दिन साजरा करण्यासाठी शंकरपूरजवळील मुक्ताई धबधब्याकडे रविवारी रवाना झाले होते. दुपारी सुमारे २.३० वाजता ते भिसीजवळ नाश्त्यासाठी थांबले असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन तरुणींना जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात रिया देवगिरीकर हिला गंभीर दुखापत झाली होती. प्राथमिक उपचारानंतर तिला नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना सोमवारी तिचा मृत्यू झाला.
या अपघातात जखमी झालेल्या मैथिली सामंत १९ वर्षे रा. नागपूर आणि ट्रिकल चिकटे २० वर्षे रा. चंद्रपूर यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. तिन्ही तरुणी नागपूर येथील एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे.
मैत्री दिनाच्या आनंदी वातावरणात सुरू झालेल्या सहलीचे काही क्षणांतच शोकांतिकेत रूपांतर झाले. एका जिवलग मैत्रिणीचा मृत्यू झाल्याने तिच्या मित्र-मैत्रिणींवर दुःखाचा डोंगर कोसळला असून महाविद्यालयीन परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणी भिसी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर पसार झालेल्या चालकाचा शोध सुरू असून, पोलिस घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे पुढील तपास करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




