महत्वाच्या बातम्या

 चाकूचा धाक दाखवून चालकाला मारहाण : तांदळाने भरलेला ट्रक चोरट्यांनी पळविला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : चाकूचा धाक दाखवून ट्रकचालकाला बेदम मारहाण करत तांदळाने भरलेला ट्रक चोरून नेल्याची घटना रावणवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम सावरी येथील बसस्थानकाजवळ शुक्रवारी १७ पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत चालक जखमी झाला असून पोलिसांनी अज्ञात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन श्रीरामचंद मौर्य ३५ वर्षे, रा. हनुमानगंज, जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश हे ट्रकचालक असून ते मध्य प्रदेशातील चाकघाट येथून ३० टन ७६५ किलो तांदूळ भरलेला ट्रक घेऊन सडक-अर्जुनीकडे जात होते. प्रवासादरम्यान झोप येत असल्याने त्यांनी शुक्रवारी १७ पहाटे सुमारे ४ वाजता ग्राम सावरी येथील बसस्थानकाजवळ ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून विश्रांती घेतली.

यावेळी चार अज्ञात आरोपी तेथे आले. त्यातील एका आरोपीने चालक नवीन यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले. नवीन यांनी त्याला पाण्याची बाटली दिल्यानंतर ते मोबाइलमध्ये वेळ पाहत असताना आरोपीने अचानक चाकूने ट्रकच्या दरवाजावर वार केला. या हल्ल्यात नवीन यांच्या हाताच्या दोन बोटांना दुखापत झाली.

यानंतर दुसऱ्या आरोपीने ट्रकचा दुसरा दरवाजा उघडून चालकाला बाहेर काढले आणि त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे नवीन खाली पडले व त्यांच्या डोक्यालाही दुखापत झाली. दरम्यान, आणखी दोन आरोपी घटनास्थळी आले. चौघांनी मिळून चालकाला मारहाण करत शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर आरोपींनी तांदळाने भरलेला ट्रक घेऊन घटनास्थळावरून पलायन केले. घटनेनंतर चालकाने रावणवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला असून चोरीस गेलेल्या ट्रकचा व आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.





  Print






News - Gondia




Related Photos