योग्य मोबदल्याशिवाय जमीन देणार नाही तिसऱ्या आऊटर रिंग रोडविरोधात शेतकरी संघर्ष सेनेच्या बैठकीत एल्गार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : तिसऱ्या आऊटर रिंग रोड प्रकल्पासाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेवरून प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि प्रशासनामधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. न्याय्य व योग्य मोबदला निश्चित झाल्याशिवाय जमिनीचे अधिग्रहण होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली असून, गरज पडल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. नऊ शेतकरी संघर्ष सेनेच्या वतीने नागपूर तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची संयुक्त बैठक झिंगाबाई टाकळी येथील महाजन पॅलेसमध्ये पार पडली. पेरणीचा हंगाम सुरू असतानाही मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी बैठकीला उपस्थिती लावल्याने प्रशासनाविरोधातील नाराजी स्पष्टपणे दिसून आली.
बैठकीत दिलीप कुकडे यांनी प्रास्ताविकातून आंदोलनाची रूपरेषा मांडली. सारंग झाडे यांनी शासन व प्रशासनाकडे करण्यात आलेल्या निवेदनांचा, सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचा आणि संघटनेने उभारलेल्या आंदोलनांचा आढावा घेतला. तहसीलनिहाय बैठकीमुळे गावापासून जिल्हास्तरापर्यंत संघटना अधिक मजबूत झाली असून, पुढील लढा अधिक संघटित आणि प्रभावीपणे उभारला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकमताने ठराव मंजूर -
बैठकीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी योग्य व न्याय्य मोबदला निश्चित होईपर्यंत जमिनीची मोजणी, सर्वेक्षण किंवा अधिग्रहणाशी संबंधित कोणतीही शासकीय प्रक्रिया पुढे नेऊ नये, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमीन अधिग्रहणाचा कोणताही प्रयत्न स्वीकारला जाणार नाही, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून पारदर्शक धोरण स्वीकारावे, अन्यथा तीव्र लोकआंदोलन उभारले जाईल, असा इशारा दिला.
News - Nagpur




Petrol Price




