महत्वाच्या बातम्या

 टाटा शोरूममध्ये लाखाची रोकड लंपास : दोन दिवसांत गुन्ह्याचा छडा, उमरेडचा आरोपी अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : पडोली परिसरातील जायका मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड (टाटा शोरूम) येथे डिजिटल तिजोरी फोडून १ लाख ८ हजार ८२९ रुपयांची रोकड चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दोन दिवसांत अटक केली आहे. आरोपीकडून चोरीतील काही रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेले टाटा हॅरियर वाहन असा २० लाख ५७ हजार १४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, शोरूमचे सर्व्हिस मॅनेजर आकांत रमेश गुजरकर ३६ वर्ष, रा. गुरुदेवनगर, पडोली, चंद्रपूर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, ३१ जुलै रोजी महिनाअखेरची क्लोजिंग सुरू असल्याने कार्यालयात वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दिवसभरातील व्यवहारातून जमा झालेली १ लाख ८ हजार ८२९ रुपयांची रोकड कॅशिअर विशाखा दुबे यांनी संगणकीय नोंद करून गोदरेज कंपनीच्या डिजिटल तिजोरीत ठेवून ती पासवर्डद्वारे लॉक केली होती. रात्री कार्यालय बंद करून सर्व कर्मचारी निघून गेले.

दुसऱ्या दिवशी १ ऑगस्ट रोजी सकाळी कार्यालयातील आलमारीचे कुलूप तुटलेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर आकांत गुजरकर घटनास्थळी पोहोचले. पाहणी केली असता, कार्यालयाच्या कोपऱ्यातील ग्रिल नसलेल्या खिडकीतून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून आलमारीचे कुलूप तोडले होते. त्यानंतर डिजिटल तिजोरी उघडून त्यातील संपूर्ण रोकड चोरून नेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९७४/२०२६ दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हाती घेतला. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रथम प्रभाकर दडमल २४ वर्ष, रा. उमरेड, जि. नागपूर याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीतील ५७ हजार १४० रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले टाटा हॅरियर वाहन जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २० लाख ५७ हजार १४० रुपये इतकी आहे.

या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५ व ३३१(४) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, आरोपीला पुढील तपासासाठी रामनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. चोरीतील उर्वरित रक्कम आणि या गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक दीपक काँक्रेडवार, योगेश हीवसे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सर्वेश बेलसरे, सुनील गौरकार, पोहवा सतीश अवथरे, इम्रान खान, लालू यादव, हिरालाल गुप्ता, पोअं किशोर वाकाटे, शशांक बदामवार यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos